Goa CM Pramod Sawant In Ayodhya: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार आणि गोवा भाजपाचे पदाधिकारी यांनी अयोध्येत जाऊन रामलला प्रभूंचे दर्शन घेतले. यावेळी गोव्यातील हजारो भाविकही अयोध्येत पोहोचले. प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत अयोध्येत गोवा भवन बांधण्याचा मानस बोलून दाखवला.
प्रमोद सावंत म्हणाले की, गोवा सरकारमधील मंत्री, आमदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांनी अयोध्येत येऊन रामललाचे दर्शन घेतले. सर्व गोवेकरांचे प्रतिनिधी म्हणून अयोध्येत आलो आहोत. रामललाचे दर्शन घेता आले, हे माझे भाग्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मंदिर ट्रस्टचे आभार मानतो. तसेच त्यांचे अभिनंदनही करतो. आमच्यासोबत गोव्यातून २ हजार भाविक रामललाचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत.
राम मंदिर हे राष्ट्र मंदिर आहे
गेली अनेक वर्ष हे मंदिर होण्यासाठी अनेकांनी वाट पाहिली आहे. अखेरीस राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. रामललाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली, हे माझे सौभाग्य आहे. राम मंदिर हे राष्ट्र मंदिर आहे. सर्व जाती-धर्माचे भाविक रामदर्शनासाठी येत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात राम मंदिर बांधून पूर्ण झाले, यासाठी त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो, असे प्रमोद सावंत यांनी सांगितले. यावेळी अयोध्येत गोवा भवन बांधण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला.
उत्तर प्रदेश सरकारने जागा दिल्यास अयोध्येत गोवा भवन बांधणार
उत्तर प्रदेश सरकारने रामललाचे दर्शन घेण्याची सर्वांची योग्य व्यवस्था केली आहे. गोवा सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवदर्शन योजनेअंतर्गत गोव्यातील ज्या ज्या भाविकांना रामदर्शन घेण्यासाठी अयोध्येत यायचे आहे, त्यांची सोय आम्ही एप्रिलनंतर व्यवस्था करणार आहोत, अशी माहिती प्रमोद सावंत यांनी दिली. तसेच योगी आदित्यनाथ यांनी आम्हाला जागा दिली, तर नक्कीच अयोध्येत गोवा सरकारच्या वतीने गोवा भवन बांधले जाईल. पुढील अनेक वर्ष गोव्यातून अनेक भाविक अयोध्येत रामदर्शनासाठी येतील. गोवा भवनामुळे गोव्यातून येणाऱ्यांची चांगली सोय होईल. उत्तर प्रदेश सरकारवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यांनी जागा उपलब्ध करून दिली, तर अयोध्येत गोवा भवन बांधण्यात येईल, असे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्य सरकारतर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी खास 'आस्था ट्रेन' सोडण्यात आली. आस्था ट्रेनमध्ये गोमंतकीय भाविकांनी 'जय श्रीराम, जय राम श्रीराम' अशा घोषणा देत वातावरण भक्त्तिमय केले. अनेकांनी भगवे ध्वज, मफलर घेऊनच प्रवास केला. अनेकजण गजर, भजन म्हणत रेल्वेत फिरत होते.