'केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरातील घटक पक्षांच्या अस्तित्त्वालाच सुरुंग'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 08:30 PM2019-03-27T20:30:48+5:302019-03-27T20:32:22+5:30
केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरात राष्ट्रीय लोकशाही घटक पक्षांच्या अस्तित्त्वालाच सुरुंग लावला जाणार आहे त्यामुळे या घडामोडींमधून घटक पक्षांनी धडा घ्यावा, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी म्हटले आहे
पणजी : गोव्यात सरकारमधील घटक पक्षांना भाजपकडूनच जास्त धोका असल्याचे मंगळवारी मध्यरात्रीच्या फोडाफोडीनंतर सिध्द झाले आहे. केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरात राष्ट्रीय लोकशाही घटक पक्षांच्या अस्तित्त्वालाच सुरुंग लावला जाणार आहे त्यामुळे या घडामोडींमधून घटक पक्षांनी धडा घ्यावा, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी म्हटले आहे.
आम आदमी पक्षाचे प्रदेश निमंत्रक एल्विस गोम्स यांनीही अशाच प्रकारची प्रतिक्रिया देताना भाजप मित्रपक्षांवर कोणत्याही क्षणी असे हल्ले चढवू शकतो, असे म्हटले आहे. मंगळवारी मध्यरात्री ज्या घडामोडी घडल्या त्या पाहता भाजपला मित्रच नसल्याचे आणि त्यांचे राजकारण हे स्वार्थी असल्याचे स्पष्ट होते. गोमंतकीयांच्या आणि पुढील पिढीच्या हिताआड हे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गोवा सुरक्षा मंचचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राजकारणातील संधीसाधूपणा, वैयक्तिक स्वार्थ आणि अनैतिकता अत्युच्च शिखरावर पोहचली असल्याचे म्हटले आहे. फोडाफोडी, घोडेबाजाराचा नंगानाच चालला आहे. पोटनिवडणुका लादून जनतेच्या पैशांचा अपव्यय चालला आहे. गोमंतकीय जनता या राजकारणाला कंटाळली आहे. विश्वासघात करणाऱ्यांना आगामी निवडणुकांमध्ये जनता घरी पाठवेल, असेही वेलिंगकर म्हणाले.