पणजी: गोव्यात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. गोव्यात आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेसची एंट्री झाल्यानं काँग्रेसला फटका बसेल आणि त्याचा फायदा भाजपला होईल, असं म्हटलं जातं. मात्र प्रत्यक्षात काँग्रेस गोव्यात सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. काँग्रेस, भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. त्यामुळे लहान पक्षांना मोठा भाव येऊ शकतो.
गोव्यात सर्वाधिक मतं भाजपला मिळतील, असं आज तक- ऍक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल सांगतो. भाजपला ३३ टक्के मतं मिळू शकतात. तर काँग्रेसला त्याखालोखाल ३२ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवण्यात काँग्रेस पुढे आहे. काँग्रेसला १५ ते २० जागा, तर भाजपला १४ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
गोव्यात विधानसभेच्या ४० जागा आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी २१ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. काँग्रेस पहिल्या, भाजप दुसऱ्या स्थानावर राहण्याचा अंदाज आहे. विधानसभेत त्रिशंकू स्थिती राहिल्यास महाराष्ट्र गोमांतकवादी पक्ष खेला करू शकतो. मगोपला १२ टक्के मतांसह २ ते ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. मगोपनं तृणमूल काँग्रेससोबत निवडणूक लढवली होती.
गेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला १७, तर भाजपला १३ जागांवर यश मिळालं होतं. मात्र त्यावेळी छोट्या पक्षांच्या मदतीनं काँग्रेसनं सत्तेचा सोपान गाठला. केंद्रात संरक्षणमंत्री असलेल्या मनोहर पर्रीकरांना मुख्यमंत्री करा, तर पाठिंबा देऊ, अशी अट लहान पक्षांना भाजप नेतृत्त्वाला घातली होती. त्यानंतर पर्रीकर दिल्ली सोडून गोव्यात आले होते.