पणजी: गोव्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खूप बदल झाला आहे. आम्ही खूप वर्षापूर्वी इफ्फीत या अगोदर आलो होतो. त्यावेळीच्या व आताच्या इफ्फीत खूप मोठा बदल व विकास झाला आहे. त्यामुळे गोवा हे कायमस्वरुपी इफ्फीचे ठिकाण म्हणून योग्य आहे, असे बॉलिवूडमधील कॉमेडी किंग संजय मिश्रा यांनी सांगितले. गोव्यात सुरू असलेल्या ५४ व्या इफ्फीत ते आले असून त्यांनी इफ्फीविषयी व गोव्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गेल्या २० वर्षात गोव्यात इफ्फीत झपाट्याने बदल झाले आहे. यामुळे देश विदेशातील कलाकार प्रतिनिधींची संख्या वाढत आहे. चित्रपट सृष्टीशी निगडीत प्रतिनिधींना इफ्फी हे एक चांगले व्यासपीठ आहे. इफ्फीमुळे देश विदेशातील कलाकार एकत्र येतात. त्यांना आपले विचार तसेच आपला अनुभव सांगण्याची संधी मिळते. त्यामुळे इफ्फीचे महत्व वाढले आहे, असेही संजय मिश्रा यांनी सांगितले.
'आताचा प्रेक्षक जागृक'
आताचा चित्रपट प्रेक्षक हा खूप जागृक आहे. त्यांना चांगले कथानक व चांगले संदेश देणारे चित्रपट जास्त आवडतात. त्यामुळे आता कसलेही विषय घेऊन केलेले चित्रपट चालत नाही. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार याच्यावर जास्त भर देत आहेत. प्रेक्षकांनी जर चित्रपट उचलायचा असेल तर चांगले कथानक असणे गरजेचे आहे. प्रेक्षक अशा चिपत्रपटांची नेहमी वाट पाहत असतात, असेही संजय मिश्रा म्हणाले.
'गोवा हे इफ्फीसाठी याोग्य ठिकाण'
गोवा हे खूपच सुंदर ठिकाण आहे. त्यात हा आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असल्याने याला एक वेगळाच रंग मिळाला आहे. गोवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने इफ्फीत यायला सर्वच कलाकारांना आवडते. कलाकार गोव्यात येत असतात. गोव्याचा निसर्ग व पर्यटन स्थळ खूपच सुंदर आहे, असेही संजय मिश्रा यांनी सांगितले.