ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 19 - विधानसभेच्या येत्या अधिवेशनात सर्व विरोधी आमदार एकत्र येतील व विधानसभेच्या पटलावर महायुती पहायला मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या काही आमदारांनी मंगळवारी व्यक्त केला. आमदार पांडुरंग मडकईकर यांनी विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्याशी मंगळवारी या विषयी चर्चा केली व विरोधकांनी अधिवेशनात संघटीतपणा दाखविल्यास बरे होईल, असे मत व्यक्त केले.प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष लुईङिान फालेरो यांच्याशी यापूर्वी आमदार दिगंबर कामत यांचीही चर्चा झाली आहे. महायुतीच्या विषयावर गट समित्यांचे मत काहीही असो; पण तुम्ही महायुतीविरुद्ध आक्रमक होऊ नका, आम्हाला निवडणुकीवेळी महायुती करावी लागेल, असे आमदारांनी फालेरो यांना सांगितले आहे.दरम्यान, मडकईकर यांनी मंगळवारी सांगितले की, येत्या अधिवेशनात आम्ही व अपक्ष आमदार मिळून एकत्रितपणे सरकारच्या गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवू. आपण राणे यांच्याशी चर्चा केली व विधानसभेत आम्हाला संघटीतपणा दाखवावा लागेल, हे मत त्यांच्यासमोर मांडले. राणे यांनीही त्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. येत्या 25 रोजी विधानसभा अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पहिली बैठक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची होईल व मग सीएलपी आणि अपक्ष व अन्य विरोधी आमदार यांची एकत्रित एक बैठक होईल.कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले की, सर्व विरोधी आमदार निश्चितच येत्या अधिवेशनात महायुतीचे दर्शन घडवतील. हे अधिवेशन शेवटचे असून लोकांच्या हिताच्या प्रश्नांवर आम्ही संघटीतपणा दाखवायलाच हवा. आम्ही त्याबाबत कमी पडणार नाही.राष्ट्रवादीचा काँग्रेसवर बाणराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुङो फिलिप डिसोझा म्हणाले की, काँग्रेस पक्ष पुन्हा भाजपलाच सत्तेवर आणू पाहतो की काय, असा संशय मला सोमवारी झालेल्या काँग्रेस गट समित्यांच्या बैठकीमुळे येत आहे. काँग्रेसने निवडणुकीवेळी महायुतीला विरोध करणे हे कशाचे लक्षण आहे, हे लोकांनाही कळू लागले आहे.