पणजी : उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी 10 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी प्राप्त केली आहे. मतमोजणी सुरू आहे. पहिल्या फेरीतील मतमोजणी पूर्ण झाली. काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांना 19 हजार 777 एवढी मते प्राप्त झाली. आम आदमी पक्षाचे उमेदवार प्रदीप पाडगावकर यांनी 578 मते मिळवली. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून श्रीपाद नाईक हे पाचव्यांदा निवडणुकीला सामोरे गेले. ते 1999 सालापासून सलग चारवेळा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या तिकीटावर जिंकले. पहिल्या फेरीत उत्तर गोव्यात नोटाला 890 मते प्राप्त झाली. काँग्रेसचे उमेदवार चोडणकर हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत. त्यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून प्रथमच निवडणूक लढवली. त्यांनी भाजपला टक्कर दिली पण भाजप तूर्त आघाडीवर आहे. भाजपची मतांची ही आघाडी वाढण्याची शक्यता आहे.दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन हे आघाडीवर आहेत. त्यांनी 61 हजार 498 मते प्राप्त केली. भाजपचे उमेदवार व विद्यमान खासदार नरेंद्र सावईकर यांनी 53 हजार 237 मते मिळवली. सावईकर हे 2014 साली प्रथमच लोकसभा निवडणूक जिंकले होते. यावेळीही त्यांनी काँग्रेसला जोरदार टक्कर दिली आहे. सध्याची सार्दिन यांची आघाडी ही जास्त नाही.दरम्यान, दुस:या फेरीवेळी म्हापसा विधानसभा मतदारसंघात भाजपचे जोशुआ डिसोझा यांनी 28 मतांची आघाडी प्राप्त केली आहे.
गोवा लोकसभा निवडणूक निकाल 2019: उत्तर गोव्यात भाजपाला आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:49 AM