सद्गुरू पाटील ल्ल पणजीसहा महिन्यांमध्ये गोव्याच्या आघाडी सरकारमधील काही मंत्री व आमदार अत्यंत वादग्रस्त मुक्ताफळे सातत्याने उधळू लागल्यामुळे गोव्याच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला आहे. भलत्याच गोष्टींसाठी गोवा सतत बातमीत राहिल्यामुळे तो चर्चेचा विषय राहिला आहे.गोव्याच्या मांडवी नदीतून कॅसिनो जुगार हटवा, अशी मागणी विरोधी आमदार नरेश सावळ, रोहन खंवटे आदी करत आहेत; पण त्यांना प्रत्युत्तर देताना भाजपचे आमदार किरण कांदोळकर यांनी गोव्यातील मंत्री-आमदारांना कॅसिनो व्यवसायातूनच वेतन मिळते, असे विधान केले. कांदोळकर यांचे विधान अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे सावळ म्हणाले.बिकिनी घालून पर्यटकांनी गोव्यात फिरू नये, असे विधान अलीकडेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते व बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. यामुळे देशभर मोठा वाद निर्माण झाला. मंत्री ढवळीकर यांचा विरोधी काँग्रेस पक्षाने निषेध केला. मग मंत्री ढवळीकर यांनी भूमिका थोडी दुरुस्त केली व पोहण्यासाठीच बिकिनींचा वापर करावा; पण बाजारपेठांमध्ये त्या कपड्यांमधून कुणी येऊ नये, असा सल्ला दिला. आता ढवळीकर यांचे बंधू व कारखाने मंत्री दीपक ढवळीकर आणि त्यांच्या पत्नीने वाद निर्माण केला आहे. कॉन्व्हेंट स्कुलमध्ये वाईट संस्कार होतात व त्यामुळे कोणीही आपल्या मुलांना तेथे पाठवू नये, असे आवाहन लता ढवळीकर यांनी केले. त्यांचे मंत्री असलेले पती दीपक ढवळीकर यांनी या विधानाचे समर्थन केले. विरोधी काँग्रेसने यावर जोरदार टीका केली आहे. लालकृष्ण अडवाणीदेखील कराचीतील कॉन्व्हेंट शाळेत शिकल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते आग्नेल फर्नांडिस म्हणाले.असे सगळे वाद सुरू असताना मंत्री सुदिन ढवळीकर यांनी विवस्त्र साधूंबाबत टिप्पणी केली. रस्त्यांवर विवस्त्र फिरण्यास साधूंवर बंदी लागू करायला हवी, अशी मागणी ढवळीकर यांनी मंगळवारी केली.माझे बंधू व मंत्री दीपक ढवळीकर, तसेच त्यांच्या पत्नी लता ढवळीकर यांच्या विधानांचा विपर्यास केला गेला. त्यांची भूमिका कॉन्व्हेंट स्कुलविरुद्ध नाही. गोव्यात काहीजण मुलींना कुंकू लावू नका, हातात बांगड्या घालू नका, असे सल्ले देतात. समाजाने त्याविरुद्ध बोलायला हवे. - सुदिन ढवळीकर, बांधकाममंत्री, गोवाभाजप व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात हिंदू व्होट बँक मिळविण्यासाठी स्पर्धा लागली आहे. ढवळीकर कुटुंबाची विधाने धोकादायक आहेत. गोव्याच्या प्रतिमेवर याचा मोठा परिणाम होत आहे.- दुर्गादास कामत, प्रवक्ते, गोवा