ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 29 - भारतामध्ये विदेशी पर्यटकांवर हल्ले करण्याचा इस्लामिक स्टेटचा अजेंडा असून गोवा पहिल्या निशाणावर असल्याची माहिती गुप्तचर विभागांना मिळाली आहे. मुंब्र्याच्या मुदब्बीर मुश्ताक शेखला अटक झाल्यानंतर त्याने इस्लामिक स्टेटच्या धोरणांची माहिती गुप्तचर खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. गुप्तचर खात्यातील सूत्रांच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने म्हटले आहे की गोव्यामध्ये विदेशी पर्यटकांना लक्ष्य करून बाँबस्फोट घडवण्याची इस्लामिक स्टेटची योजना आहे. दक्षिण आशियातल्या इसिसच्या पाठिराख्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा योजना आखण्यात येत असून यामध्ये भारतीय हस्तकांना ट्रेनिंग देण्याचा विषयही आहे.
मुदब्बीर शेख हा तथकथित अमीर ए हिंद असून त्याच्याकडून बरीच माहिती मिळत असल्याचे समजते. डिसेंबर 2014मध्येही गोव्यामध्ये घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता, परंतु भारताच्या सुरक्षा रक्षकांना वेळीच याचा सुगावा लागल्याने हे प्रयत्न हाणून पाडण्यात आले.
आत्ताही गेल्या चार महिन्यांमध्ये विविध राज्यांमधून इस्लामिक स्टेटशी संबंधित असल्याच्या संशयावरून 23 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. भारतामधून सीरिया व इराकमध्ये 30 जण इसिससाटी लढण्यासाठी गेल्याचे समजले असून त्यातले 6 जण ठार झाल्याचे वृत्त आहे.
इराक व सीरियामध्ये मजबूत फटका बसलेल्या इसिसला अफगाणिस्थानमध्ये यश मिळत नसल्याने ही दहशतवादी संघटना भारतामध्ये घातपात घडवण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता आहे. दरम्यान, पॅरीस व ब्रसेल्समधल्या हल्ल्यांनंतर भारतीय विमानतळांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.