नवी दिल्ली :पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्याविरोधात ट्विट करणाऱ्या 'गोएअर' या खासगी विमान कंपनीतील पायलटला थेट घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह आणि अवमानकारक ट्विट केल्याप्रकरणी संबंधित पायलटचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली.
मिकी मलिक असे त्या पायलटचे नाव आहे. मिकी मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. मिकी मलिक यांनी केलेल्या ट्विटवर कंपनीने आक्षेप घेतला आणि तत्काळ निलंबन करण्याची कारवाई केली, असे समजते.
मिकी मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींबद्दल अपशब्द वापरल्याने अनेकांनी या ट्विटवर आक्षेप नोंदवत संताप व्यक्त केला. वाद वाढत गेल्यावर मलिक यांनी ते ट्विट डिलीट केले. तसेच संबंधित ट्विटसंदर्भात माफी मागितली. पंतप्रधान मोदी आणि अन्य काही आक्षेपार्ह ट्विट्सबाबत माफी मागतो. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, ट्विटमध्ये नोंदवलेली मते माझी वैयक्तिक होती. या ट्विटशी गोएअरचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही संबंध नाही, असे मलिक यांनी सांगितले.
मलिक यांनी केलेल्या ट्विटप्रकरणी गोएअरने तातडीने कारवाई करत तडकाफडकी त्यांना कामावरून काढून टाकले आहे. गोएअरचे अशा प्रकरणात झिरो टॉलरन्स धोरण आहे. कंपनीचे नियम, कायदे, धोरण पाळणे हे सर्व कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे, असे गोएअर कंपनीच्या प्रवक्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.