चंदीगडच्या मनीमाजरा येथून जवळपास 11 वर्षांपूर्वी एक तरुण अचानक बेपत्ता झाला होता. पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र त्याला शोधण्यात पोलिसांना अपयश आलं. पण आता तब्बल 11 वर्षांनंतर तरुण सापडला. 11 वर्षांपूर्वी चंदीगडच्या मनीमाजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये मोहसीन नावाचा 17 वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले होते. यादरम्यान पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहसीनचे मानसिक संतुलन ठीक नव्हते. यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. मात्र, मोहसीनचा शोध घेण्यात अपयश आलं. 11 वर्षांपूर्वी मोहसीनसोबत कुटुंबाचा आनंद हरवला होता. मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी तो परत सापडल्याने कुटुंबीयांना खुप जास्त आनंद झाला आहे. मोहसीनच्या आईने एका खासगी वाहिनीला सांगितले की, वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी मोहसीनचे मानसिक संतुलन थोडेसे बिघडले होते.
एक दिवस तो अचानक घरातून गायब झाला आणि त्यानंतर मोहसीन घरी परतलाच नाही. मात्र, तब्बल 11 वर्षांनी रक्षाबंधनाच्या दिवशी मोहसीन आपल्या घरी परतला आहे. आईने सांगितले की, त्यांचा मुलगा 11 वर्षांपूर्वी अचानक घरातून गायब झाला होता. कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र तरीही त्यांचा एकुलता एक मुलगा सापडला नाही. यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला, पण पोलिसांनाही त्यांचा मुलगा शोधण्यात अपयश आले होते.
आता तब्बल 11 वर्षांनंतर अचानक पोलीस स्टेशनमधून फोन आला आणि अधिकाऱ्याने सांगितलं की त्यांचा हरवलेला मुलगा सापडला आहे. हे ऐकून कुटुंबीयांना प्रचंड आनंद झाला, ते आनंदाने वेडे झाले. पोलिसांनी मुलाचा फोटो कुटुंबीयांना दाखवताच कुटुंबीयांनी मुलाची ओळख पटवून लगेचच पोलीस ठाण्यात जाऊन त्याला आपल्या घरी आणलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.