ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांच्या संसदेचे चित्रीकरण करणा-या व्हिडीओवरुन शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ झाला. या गदारोळामुळे लोकसभा २५ जुलै सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. भगवंत मान यांनी गुरुवारी मोबाईल कॅमे-यातून संसेदेचे चित्रीकरण केले.
११ मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये संसदेतील अंतर्गत चित्रीकरण असून, सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे. सर्वपक्षीय खासदारांनी या कृत्याचा निषेध केला असून, भगवंत मान यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मी पुन्हा असा व्हिडीओ काढीन असे भगवंत मान म्हणतो त्याला तात्काळ निलंबित करा अशी मागणी भाजप खासदार आरके सिंह यांनी केली.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज भगवंत मान यांना बोलवून आपली नाराजी त्यांच्या कानावर घातली. हा व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. संसदेच्या सुरक्षेसाठी १३ लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. हा गंभीर विषय आहे असे सुमित्रा महाजन म्हणाल्या.
मान यांचा माफीनामा
संसदेचं मोबाईलमधून चित्रीकरण करणं, ते ही खासदारानं ही अत्यंत गंभीर बाब असल्याची टीका चहुबाजुंनी झाली. सुरक्षा विषयक नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप सर्व खासदारांनी केला आणि त्यानंतर मान यांनी माफी मागितल्याचे वृत्त आहे. सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे मान लेखी माफीपत्र लवकरच देतील असेही सांगण्यात येत आहे.