हैदराबाद - लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा घटक असतो. त्यामुळे प्रत्येकजण आपला विवाह वेगळ्या पद्धतीनं करत असतो, जो आयुष्यभर आपल्या स्मरणात राहिल. सध्या तर थीम वेडिंगचा ट्रेंड सुरू आहे. प्रत्येकाला आपलं लग्न हटके स्टाईल करायचे असते. आंध्रप्रदेशमध्ये एका आध्यात्मिक गुरूंनं मुलीचा विवाह 'देवलोक' स्टाइलनं केला आहे. यामध्ये नवरी 'लक्ष्मी' तर नवरदेव 'विष्णू' अवतारात होते. एवढेच नाही तर वऱ्हाडी मंडळीही या सोहळ्यात देवांच्या गेटअपमध्ये आल्याने जणू धर्तीवर 'देवलोक'च अवतरला की काय असं वाटत होतं. गेल्या आठवड्यात आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील तनुकू गावात हा विवाह सोहळा पार पडला..
आंध्र प्रदेशमधले अध्यात्मिक गुरु श्रीधर स्वामी यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी ही थीम ठेवली होती. दागदागिने भरजरी साड्या, डोक्यावर मुकुट अशा वेशात लग्नाला पाहुणे आले होते. श्रीधर स्वामी यांचा आश्रमदेखील आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आंध्र प्रदेशमध्ये आहे.
आपल्या मुलीचं लग्न एखाद्या पौराणिक कथेतील विवाहाप्रमाणे व्हावं असा त्यांचा अट्टहास होता. अध्यात्मिक गुरु श्रीधर स्वामी आणि त्यांच्या पत्नीने देखील देवतांसारखी वस्त्रे परिधान केली होती. एखाद्या पौराणिक मालिकेचं चित्रकरण सुरु असल्याप्रमाणे त्यांचा लग्न मंडप सजवण्यात आला होता. या लग्नसोहळ्याचे व्हायरल झालेले फोटो पाहून अनेकांचे डोळे पांढरेफट्ट पडले नसतील तर नवल.
गेल्या आठवड्यात दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जूनचा मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री सामंता रूथच्या विवाहाची सोशल मीडियात बरीच हवा होती. पण या अनोख्या लग्नाची गोष्ट कळताच त्याच्या व्हिडिओ आणि फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.