CAA Protest : बहुसंख्याकांनी संयम गमावल्यास गोध्रासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते- भाजपा मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 04:22 PM2019-12-20T16:22:12+5:302019-12-20T16:25:23+5:30
Citizen amendment act protest : विरोधकांना, आंदोलकांना भाजपा मंत्र्यानं करुन दिली गोध्र्याची आठवण
बंगळुरु: सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशातलं वातावरण पेटलं असताना आता राजकीय नेत्यांमध्ये वाकयुद्धाला सुरुवात झाली आहे. बहुसंख्याकांनी संयम गमावल्यास गोध्रासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकेल, असा इशारा भाजपा नेते आणि कर्नाटकचे सांस्कृतिक मंत्री सी. टी. रवी यांनी दिला आहे. कर्नाटकमध्ये सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यास राज्य पेटेल, असं विधान काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यू. टी. खादेर यांनी केलं होतं. त्यांना रवी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
खादेर यांच्या विधानाचा संदर्भ देत रवी यांनी जोरदार टीका केली. 'याच मानसिकतेमधून गोध्र्यात रेल्वे पेटवण्यात आली आणि कारसेवकांना जिवंत जाळण्यात आलं. पण त्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरादाखल काय घडलं याची खादेर यांना कल्पना असेल. गोध्र्यात रेल्वे जाळण्यात आल्यानंतर लोकांनी काय केलं, हे खादेर यांनी पाहिलं असेल. जर ते गोध्र्यातील ती घटना विसरले असतील, तर आम्ही त्यांना त्याची आठवण करुन देऊ,' असा धमकीवजा इशारा रवी यांनी दिला.
बहुसंख्यांक शांत आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्या भागांमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात, अशा शब्दांमध्ये रवी यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. परिस्थिती चिघळवू पाहणाऱ्यांना त्यांनी यावेळी थेट इशारा दिला. बहुसंख्यांकांनी संयम राखला आहे म्हणून तुम्ही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही जरा मागे वळून पाहावं असा सल्ला मी देईन. गोध्र्यातील घटना आठवून पाहिल्यास आमचा संयम संपल्यावर काय होतं ते तुम्हाला कळेल. आमच्या संयमाला आमचा कमकुवतपणा समजू नका. तुम्ही राज्यातील सार्वजनिक संपत्तीचं कसं नुकसान करत आहात आणि परिस्थिती स्फोटक करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून कशा पद्धतीनं सुरू आहे, हे आम्ही पाहत आहोत, असं रवी म्हणाले.