रायपूर- पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानमधल्या पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याला सिद्धू उपस्थित राहिल्यानं त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाली होती. त्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला होता. आता त्याच मुद्द्याला हात घालत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.सिद्धू म्हणाले, ज्यांचं नाव गोध्रा हत्याकांडात आहे, त्यासमोर मला देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा प्रचार करत असताना सिद्धू यांनी मोदींवर हा हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदींना इम्रान खान यांनी शपथविधी सोहळ्याला बोलावलं नाही, याचा त्यांना हेवा वाटतोय का?, नवाज शरीफ यांच्या जन्मदिवशी मोदी न बोलवताही पाकिस्तानात गेले होते. ज्या लोकांचं नाव गोध्रा हत्याकांडात आहे, त्यांच्यासमक्ष मी देशभक्ती सिद्ध करणार नाही. यावेळी त्यांनी भाजपावरही टीका केली आहे.नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या मुद्द्यांवरून त्यांनी मोदी आणि शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देशाच्या जनतेला बदल हवा आहे. 2014मध्ये असलेल्या मोदी लाटेचा आता अतिरेक झाला आहे. काळा पैसा भारतात आणून गरिबांमध्ये वाटणार हे मोदी सरकारनं दिलेलं आश्वासन हवेत विरलं आहे. आता मोदींच्या याच भूलथापा गरिबांना विषासमान आहेत. नोटाबंदीचा निर्णय फसला. जे शेतकरी स्वतःच्या शेतात कामगार लावतात ते काय चोर आहेत. या देशातील 36 कोटी लोक काम करतात ते काय चोर आहेत, असंही म्हणत सिद्धू यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.
गोध्रा कांडात नाव असलेल्यांकडे देशभक्ती सिद्ध करणार नाही, सिद्धू यांचा मोदींवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 9:01 PM