देवाच्या दारातच थाटला संसार अतिक्रमणग्रस्तांचे प्रचंड हाल : कचरा, खत कारखान्याजवळून हाकलून लावले मनपाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2016 6:15 PM
जळगाव: दूध फेडरेशनसमोरील झोपडपीचे अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर पर्यायी व्यवस्था न झाल्याने सखुबाई सुखदेव दुसींग (वय ९०) या वृध्देने देवाच्या दारात सामान ठेवून संसार थाटला आहे तर काही जणांनी रस्त्याच्या कडेलाच थांबून रात्र काढली. दरम्यान, शिवाजी नगराला लागूनच असलेल्या कचरा व खत प्रकल्पाच्या मोकळ्या जागेत बहुतांश जणांनी संसार हलविला, मात्र तेथूनही मनपाच्या कर्मचार्यांनी हाकलून लावले. त्यामुळे या अतिक्रमणग्रस्तांचे प्रचंड हाल होत आहेत.
जळगाव: दूध फेडरेशनसमोरील झोपडपीचे अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर पर्यायी व्यवस्था न झाल्याने सखुबाई सुखदेव दुसींग (वय ९०) या वृध्देने देवाच्या दारात सामान ठेवून संसार थाटला आहे तर काही जणांनी रस्त्याच्या कडेलाच थांबून रात्र काढली. दरम्यान, शिवाजी नगराला लागूनच असलेल्या कचरा व खत प्रकल्पाच्या मोकळ्या जागेत बहुतांश जणांनी संसार हलविला, मात्र तेथूनही मनपाच्या कर्मचार्यांनी हाकलून लावले. त्यामुळे या अतिक्रमणग्रस्तांचे प्रचंड हाल होत आहेत.रेल्वे प्रशासनातर्फे शुक्रवारी ३५० झोपड्यांवर बुलडोझर चालविण्यात आले. या अतिक्रमणधारकांना प्रशासनाने दोन महिन्यापूर्वी नोटीस देऊन पूर्वकल्पना दिली होती, त्यानुसार ही मोहीम राबविण्यात आली. बेघर झालेल्या यातील बहुतांश कुटुंबाची पर्यायी व्यवस्था न झाल्याने त्यांचा सामान अजूनही रस्त्याच्याच कडेला आहे. बायका व लहान मुला-बाळांसह रात्र त्याच जागेवर काढण्यात आली तर शनिवारी आडोश्याला पत्रे लावून वर साडी व अन्य कापड टाकून उन्हापासून बचाव करण्यात येत होता.अनेकांनी भागवली पोटाची भूकविस्थापित झालेल्या या कुटूंबाचा संसार उघड्यावर आल्याने गेंदालाल मील भागातील काही तरुण व त्याच परिसरातील साईबाबा मंदिराची सेवा करणार्या तरुणांनी पुढाकार घेऊन या कुटुंबाना रात्री खिचडीचे जेवण पिण्यासाठी पाणी पुरविले. तर सकाळी चहाची व्यवस्था केली. शनिवारी मात्र एकाचीही चूल पेटली नाही. लहान मुलांसाठी बाहेरुन जे मिळेल ते खायला आणण्यात आले.सरकारी बांधकाम तोडलेदुसर्या दिवशी शनिवारीही उर्वरित अतिक्रमण काढण्यात आले. रेल्वे प्रशासनाचेही बांधकाम शनिवारी जेसीबीद्वारे तोडण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे सुरक्षा बलाचा तगडा बंदोबस्त दुसर्या दिवशी कायम ठेवण्यात आला. जिल्हा पोलीस दलाचा बंदोबस्त मात्र काढून घेण्यात आला होता. बंदोबस्तावर असलेल्या या कर्मचार्यांनाही जागेवरच नाश्ता व जेवण पुरविण्यात आले.दशक्रिया विधी झालाच नाहीया परिसरात राहणारे मधुकर बनसोडे यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले होते. शनिवारी त्यांचा दशक्रिया विधी होता, मात्र अतिक्रमणात घरे जमीनदोस्त झाल्याने रहायलाच जागा नाही, तर विधी कसा करायचा म्हणून मोठा पेच बनसोडे परिवाराला पडला होता. शिवाय पाण्याचा व पाहुणे मंडळीचाही प्रश्न होताच, त्यामुळे नाईलाजाने हा विधीच रद्द करण्याची दुर्दैवी वेळ बनसोडे कुटुंबावर आली. दोन दिवस उशिराने अतिक्रमण काढले असते तर हा विधी होऊ शकला असता.