नवी दिल्लीः नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर चहूबाजूंनी टीका केली जात आहे. आता काँग्रेसनंही साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर पलटवार केला आहे. काँग्रेस नेते आणि भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात लढणाऱ्या दिग्विजय सिंह यांनी नथुराम गोडसेवरच्या साध्वीच्या विधानावरून मोदी, शाह आणि भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. भाजपानं साध्वीच्या या विधानावर देशाची माफी मागावी. मी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विधानाचा निषेध करतो.नथुराम गोडसे एक हत्यारा होता. त्याचं उदात्तीकरण करणं ही देशभक्ती नव्हे, तर तो राष्ट्रद्रोह असल्याचंही दिग्विजय सिंह म्हणाले आहेत. साध्वींच्या 'त्या' विधानावरून भाजपानं हात वर केले आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या त्या मताशी भाजपा सहमत नाही. आम्ही त्या विधानाचा निषेध करतो. तसेच साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून भाजपा यासंदर्भात खुलासा मागणार असून, त्यांनी आपल्या विधानाची माफी मागावी, असं भाजपाचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी म्हटलं आहे.