राजस्थानमधील जयपूर येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचमधील सूत्रांन दिलेल्या माहितीनुसार चंडीगड येथून पकडण्यात आलेले दोन शूटर आणि त्यांच्या एका सहाय्यकाने धक्कादायक कबुली दिली आहे. आरोपींनी सांगितले की, गोगामेडी यांची हत्या करताना मारला गेलेला नवीन शेखावत यानेच ठिकाणाची संपूर्ण रेकी केली होती. तोच दोन्ही शूटर नितीन फौजी आणि रोहितला घेऊन सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या घरी आला होता. चौकशीमध्ये आरोपींनी सांगितले क, गोगामेडी यांची हत्या करण्यापूर्वी सुमारे एक आठवडा आधी याचा कट रचण्यात आला होता.
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या करणाऱ्या शूटर्सनी पोलिसांना सांगितले की, नवीन शेखावत हा सुद्धा हत्येच्या कटामध्ये सहभागी होता. मात्र आम्हाला अखेरच्या क्षणी त्याच्यावर गोळी झाडावी लागली. तुम्ही सीसीटीव्हीमध्ये पाहू शकता की, जेव्हा फायरिंग होत होती. तेव्हा नवीन घाबरला. तो आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर गोळीबार करावा लागला.
दरम्यान, या हत्याकांडामध्ये सहभागी असलेले दोन आरोपी नितीन फौजी आणि रोहित सिंह राठोड यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्या उधम याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या तिघांनाही शनिवारी रात्री चंडीगडमधील एका दारूच्या गुत्त्याजवळून अटक केली आहे. फौजी आणि राठोड यांना अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल आणि राजस्थान पोलिसांच्या एसआयटीने संयुक्त मोहीम राबवली होती. ही संपूर्ण कारवाई एडीजी क्राईम दिनेश एमएन आणि पोलीस आयुक्त बीजू जॉर्ज जोसफ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांनी फौजी आणि राठोड यांना अटक करण्यापूर्वी ९ डिसेंबररोजी संध्याकाळी त्यांचा सहकारी रामवीर जाट याला बेड्या ठोकल्या होत्या. रामवीर हा हरियाणामधील महेंद्रगड येथील रहिवासी आहे. त्यानेच सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर आरोपींना जयपूर येथून पळून जाण्यास मदत केली होती.