ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - भारताला इसिसपासून धोका असल्याने अमेरिकेने आपल्या नागरीकांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली आहे. इसिसची भारतात हल्ला करण्याची योजना होती असे वृत्त अलीकडेच भारतीय माध्यमांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरीकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे.
धार्मिक स्थळे, बाजारपेठांपासून दूर रहाण्याचे आवाहन अमेरिकन नागरीकांना करण्यात आले आहे. परदेशी नागरीकांचा वावर असलेली ठिकाणे इसिसकडून लक्ष्य केली जाऊ शकतात असे अमेरिकेचे म्हटले आहे. आपल्या सुरक्षेची काळजी घ्या आणि जास्त सर्तक रहा असे अमेरिकेने आपल्या नागरीकांना संदेश दिला आहे.
अमेरिकेकडून पहिल्यांदाच अशा प्रकारची खास ट्रॅव्हल अॅडव्हायजरी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दक्षिण आशियामध्ये हिंसाचार घडवून आणण्यासाठी स्थानिक कट्टरपंथीय गटांना रसद पुरवण्याचा इसिसचा कट यापूर्वीही अनेकदा उघड झाला आहे.