राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज कोण ओळखत नाही. परंतू एक वेळ होती, पाकिस्तानात डोवाल यांना गुप्तहेर म्हणून कोण ओळखत नव्हते. एकदा ते कव्वाली ऐकायला गेले होते, तेव्हा त्यांचा किस्साच संपण्याची वेळ आली होती परंतू ते बालंबाल बचावले आहेत.
डोवाल हे केंद्र सरकारमधील सर्वात ताकदवान अधिकारी मानले जातात. डोभाल यांची पंतप्रधानांशी असलेली जवळीक पाहून त्यांच्या स्थितीचा अंदाज लावता येतो. देशाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांच्या मताचे महत्त्व आणि महत्त्वाच्या प्रसंगी त्यांची उपस्थिती यावरून त्यांचा दर्जा कळू शकतो. पीएम मोदींचा उजवा हात मानल्या जाणार्या डोवाल यांच्या हेरगिरीच्या अनेक कहाण्या आहेत. अजित डोवाल यांचा आज वाढदिवस आहे.
पंजाबपासून ईशान्येपर्यंत, कंदाहारपासून काश्मीरपर्यंत त्यांचा दहशतवादाविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. ईशान्येतील मोहिमेवेळी डोवाल यांची पत्नी त्यांच्यावर नाराज झाली होती. डोवाल यांनी स्वत: एका मुलाखतीदरम्यान आपल्या रोमांचक कारकिर्दीबद्दल सांगितले. जेव्हा डोवाल मिझोरममध्ये तैनात होते, तेव्हा त्यांनी काही लोकांना त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते. हे दुसरे तिसरे कोणी नव्हते, हे वेशांतर केलेले प्रसिद्ध लालडेंगाच्या मिझो नॅशनल फ्रंटचे आर्मी कमांडर होते. मिझो बंडात त्यांचा सहभाग होता.
अनेक वर्षांनी डोवाल यांच्या पत्नीला हे माहिती पडले तेव्हा ती नाराज झाली होती. ते नागा विद्रोही होते, डोवाल यांनी त्यांनाही मदत केलेली आणि मिझोराम सरकारलाही. तो त्यांच्या मिशनचाच भाग होता, यामुळे यात गुन्हा काहीच नव्हता.
डोवाल जेव्हा अंडर कव्हर एजंट म्हणून ६ वर्षे पाकिस्तानात होते तेव्हा त्यांची पोलखोल होता होता राहिलेली. लाहोरच्या लोकल मार्केटमध्ये डोवाल एका दर्ग्यात कव्वाली ऐकायला गेले होते. मध्यम वर्गीय मुस्लिम तरुणाच्या वेशभुषेत ते होते. तेवढ्यात पाकिस्तानी गुप्तहेर विभागाचा अधिकारी त्यांच्याजवळ आला. डोवालांना काय करावे सुचेना, त्याने डोवालांच्या कानात तुमची नकली दाढी लटकत असल्याचे सांगितले. त्याला थोडाजरी संशय आला असता तरी डोवाल यांचा खेळ खल्लास झाला असता. परंतू, तो फक्त तेवढेच सांगण्याच्या उद्देशाने आला होता. डोवाल यांनी तिथे घाबरल्याचे न दाखवता लागलीच काढता पाय घेतला होता.