नवी दिल्ली : मुगल बादशहा बहादूर शाह जफर यांचे वंशज असल्याचा दावा करणारे राजकुमार याकूब हबीबुद्दीन तुसी यांनीही अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राममंदिरासाठी एक किलो सोन्याची वीट देऊ केली आहे. सोन्याची वीट पंतप्रधान मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी तुसी यांनी पंतप्रधानांच्या भेटीसाठी वेळ मागितला आहे.
शेवटचे मुगल बादशहा बहादूर शाह जफर यांच्या सहाव्या पिढीचे वंशज असलेले तुसी यांनी म्हटले आहे की, शंभर कोटी हिंदू बांधवांची अपार श्रद्धा असलेला हा मुद्दा सलोख्याने सोडविण्यात आला, ही बाब हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समुदायांसाठी आनंदाची आहे.
भारतातील हिंदू बांधवांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो. दिलेल्या शब्दानुसार एक किलोची सोन्याची वीट देण्याची इच्छा आहे. ही सोन्याची वीट पंतप्रधानांकडे सुपूर्द करण्यासाठी मी त्यांची वेळ मागितली आहे. राममंदिराच्या उभारणीच्या देखरेखीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विश्वस्त मंडळाच्या एका सदस्यानेही अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी सर्व समुदाय देणगी देऊ शकतात, असे म्हटले होते. श्री राम यांच्यावर श्रद्धा, भक्ती असलेल्या कोणाकडूनही देणगी स्वीकारली जाईल, मग ती व्यक्ती कोणत्याही समुदायाची असो, असे कर्नाटकातील उडुपीस्थित पेजावर मठाचे मठाधिपती विश्वप्रसन्न तीर्थ स्वामी यांनी म्हटले होते.