नवी दिल्ली : जगभरात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे भारतामध्ये होणारी सोन्याची आयात एप्रिल महिन्यामध्ये १०० टक्क्यांनी घटली आहे. सलग पाचव्या महिन्यामध्ये देशात होणारी सोन्याची आयात कमी झाली आहे, हे विशेष होय.
वाणिज्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात देशामध्ये २८.३ डॉलर मूल्याच्या सोन्याची आयात झाली आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ३९.७ लाख डॉलरच्या सोन्याची आयात देशामध्ये झाली होती. गेल्या सलग पाच महिन्यांपासून देशातील सोन्याची आयात कमी होत आहे.
देशातून होणारी रत्न आणि दागिन्यांची आवक एप्रिल महिन्यामध्ये ९८.७४ टक्क्यांनी कमी होऊन ३.६ कोटी डॉलरवर पोहोचली आहे. मागील वर्षामध्ये त्यात घट झाली होती.
भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार देश आहे. दरवर्षी ८०० ते ९० टन सोन्याची भारतामध्ये आयात होत असते. सोन्याची आयात कमी झाल्याने देशाच्या आयात-निर्यात व्यापारातील तफावत कमी होत आहे. एप्रिलमध्ये आयात-निर्यात व्यापारातील तूट ६.८ अब्ज डॉलर एवढी राहिली आहे. मागील वर्षाच्या एप्रिल महिन्यात ही तूट १५.३३ अब्ज डॉलर एवढी होती. सन २०१९-२० मध्ये देशातील सोन्याची आयात १४.२३ टक्क्यांनी कमी होऊन २८.२ अब्ज डॉलर रुपयांची झाली होती.