ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - भारतीय लष्कराच्या गोरखा रायफल्सने जगातील अत्यंत कठीण समजल्या जाणा-या कॅम्ब्रिअन गस्त अभ्यासात सुवर्णपदक जिंकलं आहे. ब्रिटीश लष्कराने आयोजित केलेल्या या अभ्यासात गोरखा रायफल्सच्या 2/8 बटालिअनने सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.
वेल्समध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात भारतीय लष्कराला सुवर्णपदकाने गौरवण्यात आलं. ब्रिटीश लष्कराने यासंबंधीचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केला आहे. बटालिअनमध्ये सहभागी असलेल्या आठ जवानांना सुर्वपदक प्रदान करण्यात आलं, सोबतच प्रशस्तीपत्रकही देण्यात आलं. कॅम्ब्रिअन गस्त अभ्यास हा वेल्समधील कॅम्ब्रिअन शिखरावर दरवर्षी पार पडणारा आंतरराष्ट्रीय लष्कर सैन्य अभ्यास आहे. हा अभ्यास जगातील अत्यंत कठीण अभ्यासांपैकी एक असल्याचं म्हटलं जातं.
A Company, 2nd Battalion The Royal Gurkha Rifles team put in a gold medal winning performance in the World Class #CambrianPatrolpic.twitter.com/RYQ5XrPtPN— British Army (@BritishArmy) October 18, 2016
कॅम्ब्रिअन अभ्यासात शिखरावरील 55 किमी लांब दुर्गम रस्ता पार करायचा असतो. यामध्ये सहभागी होणा-यांना टास्क दिला जातो. यासाठी त्यांना 48 तासांचा अवधी देण्यात येतो. टास्क पुर्ण करण्यासाठी त्यांना स्वतंत्र किट आणि सामान सोबत देण्यात आलेलं असतं. प्रत्येक टीमला देण्यात आलेल्या कामगिरीच्या आधारावर अंक दिले जातात. जर किटमधील काही सामान हरवलं असेल तर अंक कमी केले जातात.