सोने तस्करी; चौकशीसाठी ‘एनआयए’ला परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 04:30 AM2020-07-10T04:30:50+5:302020-07-10T04:31:23+5:30
याप्रकरणी प्रभावी चौकशी करण्याकामी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती करणारे पत्र केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी पंतप्रधानांना बुधवारी पाठविले होते.
नवी दिल्ली/कोची : तिरुवअनंपुरम (केरळ) आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सोने तस्करीचे पाळमुळे शोधण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या फरार महिला आणि तिच्या मित्राचा ठावठिकाणा शोधण्यासाठी केंद्रीय संस्थांनी केरळ पोलिसांची मदत मागितली आहे.
याप्रकरणी प्रभावी चौकशी करण्याकामी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती करणारे पत्र केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी पंतप्रधानांना बुधवारी पाठविले होते. त्यानंतर गृह मंत्रालयाने एनआयएला याप्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी दिली. राजनैतिक सुरक्षाप्राप्त व्यक्तीच्या नावाने आखातातून पाठविण्यात आलेल्या सामानात दडविण्यात आलेले १५ कोटी रुपयांचे ३० किलो सोने सीमा शुल्क विभागाने जप्त केले होते.
दरम्यान, कोची येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी (आर्थिक गुन्हे) कोर्टाने केरळस्थित विदेशी महावाणिज्य दूतावरील माजी कर्मचारी सरीत याला १५ जुलैपर्यंत सीमा शुल्क विभागाची कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या फरार महिलेने अटकपूर्व जामिनासाठी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारी रात्री तिने आॅनलाईन जामिनासाठी अर्ज दाखल केला.
सोने तस्करी प्रकरणावरुन विरोधी पक्षांनी केरळचे मुख्यमंत्री विजयन यांच्यावर निशाणा साधला.
राज्य आणि केंद्र सरकारमधील लोकांच्या सहकार्याशिवाय सोन्याची तस्करी होणे शक्य नाही, असा संशय व्यक्त करुन काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली.