लखनऊ - उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे सोन्याची खाण मिळाल्याची चर्चा संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. मात्र हे सोनं कोणी पाहिलं? कुठे मिळालं? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत मात्र या सर्व गोष्टीचं उत्तर मिळालं नाही, सध्यातरी सोनभद्र येथे ३ हजार टन सोनं मिळाल्याची बातमी जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडून फेटाळून लावली आहे.
या एजेंसीने स्पष्ट केले आहे की, सोनभद्र येथे ३ हजार टन नाही तर केवळ १६० किलो सोनं मिळण्याची शक्यता आहे.जीएसआयच्या दाव्यानुसार व्हायरल होणाऱ्या बातमीला ब्रेक लागला आहे. मात्र सोनभद्रमध्ये सोनं मिळाल्याची बातमी आली कुठून? तर आयएएनएसच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील उत्खनन विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या काही पत्र लीक झाल्याने ही बातमी पसरली. ज्यात ३१ जानेवारी २०२० जारी केलेल्या पत्रात सोन्याबाबत संपूर्ण माहिती दिली गेली आहे.
पत्रात नमूद केलंय की, पहाडी ब्लॉकमध्ये २ हजार ९४३ टन तर हरदी ब्लॉकमध्ये ६४६.१५ टन किलो सोनं असण्याची शक्यता आहे. या दोन्ही ब्लॉकला मिळून ३ हजारांहून अधिक सोनं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पत्रात असंही लिहिलंय की, जीएसआयकडून या खजिन्याचा लिलाव करण्यासाठी एक रिपोर्ट तयार करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी जमिनीचं मोजमाप करण्याचं काम सुरु आहे.
इतकचं नाही तर सोनं काढण्यासाठी ७ लोकांची विशेष टीम तयार केली आहे. याची माहिती पसरली तर लोकांपर्यंत पोहचेल असं पत्रात लिहिलं आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी सोनं मिळण्याच्या बातमीला देवाचा आशीर्वाद असं म्हटलं आहे.
मात्र ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने कोलकाता येथील जीएसआयच्या मुख्यालयाने यावर पत्रक काढत सोनभद्रमध्ये ३ हजार टन सोनं मिळाल्याचा दावा चुकीचा असल्याचं स्पष्ट केले आहे. दरम्यान, सोनभद्र येथे इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं मिळाल्यामुळे यूपीत आनंदाचं वातावरण होतं. मात्र हा खजिना काढण्यापूर्वी त्याला अनेक विषारी सापांनी घेरलं असल्याचं सांगितलं होतं.