एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारच्या जमुई जिल्ह्यात चक्क मोठ्या प्रमाणात सोने असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत हे सोने बाहेर काढले तर बिहारची भरभराट येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अहवालानुसार, जमुई जिल्हा मुख्यालयापासून ४८ किलोमीटर अंतरावर असलेल्या करमतियामध्ये संपूर्ण देशाच्या एकूण सोन्याच्या साठ्यापैकी ४४ टक्के सोन्याचा साठा आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे सोने काढण्यास केव्हा सुरुवात होणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.
पायाभूत सुविधांचाही विकास होणार
या सोन्याच्या उत्खननामुळे जमुई जागतिक स्तरावर प्रसिद्ध तर होईलच शिवाय यामुळे स्थानिक लोकांना रोजगारही मिळेल. याशिवाय पायाभूत सुविधांचाही विकासही होईल.
२०२२ मध्ये केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण पथकाच्या तपासणी अहवालानंतर सरकारी पातळीवर ही माहिती सार्वजनिक केली होती. यानंतर बिहार सरकारच्या तत्कालीन खाण मंत्र्यांनीही बिहार विधानसभा आणि परिषदेत ही माहिती दिली होती.
आदेशाची प्रतीक्षा...
सोन्याच्या साठ्याच्या उत्खननासाठी बिहार सरकारने परवानगी घेण्याचा विचार केला आहे. भूगर्भीय सर्वेक्षण विभागाचे संचालक रुपेश कुमार यांनी सांगितले की, येथील सोन्याच्या साठ्याच्या शोधाशी संबंधित अहवाल सादर केले आहेत.
आता या दिशेने पुढील कार्यवाहीसाठी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.
येथे मोठ्या प्रमाणात सोने असल्याचे १९८१ मध्ये प्रथम समोर आले. त्यानंतर येथील गावकरी रातोरात श्रीमंत झाले. हे लोक डोंगर खोदून सोने काढायचे आणि विकायचे, असे सांगितले जात होते. त्यामुळे भारत सरकारने १९८२ मध्ये येथे उत्खननावर बंदी घातली.