लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या : येथील राम मंदिराच्या तळमजल्यावरील काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता मंदिरात दरवाजे बसवण्याची तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या तळमजल्यावर लावण्यात येणारे १४ दरवाजे हैदराबादच्या अनुराधा टिंबर्स इंटरनॅशनलचे संचालक सरथ बाबू यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातून आणलेल्या सागवानाच्या लाकडापासून बनवले जात आहेत.
या दरवाजांवर तांब्याची परत लावण्यात आली असून, त्यावर सोन्याचा मुलामा देण्यात येणार आहे. कन्याकुमारी येथील कारागीर गेल्या तीन महिन्यांपासून या कामात गुंतले आहेत.
किती फूट उंच आहेत दरवाजे?
राम मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजाची उंची ८ फूट असून, दरवाजाची रुंदी १२ फूट आहे. दरवाजांवर अंतिम हात फिरविण्यासाठी ते दिल्लीला पाठवण्यात आले आहेत. या दरवाजांवर भव्यतेचे प्रतीक हत्ती, विष्णू कमळ, स्वागताच्या मुद्रेतील देवीच्या प्रतिमा कोरल्या आहेत.
स्थापत्यशैली कोणती वापरली? दरवाजावर मोर, कमळ अन्...
दरवाजे नागर शैलीत डिझाइन केलेले आहेत. यात कमळ, मोर आणि इतर पक्ष्यांचे पारंपरिक भारतीय आकृतिबंध प्रदर्शित केले आहेत. नागर मंदिर स्थापत्यशैली ही उत्तर भारतीय पारंपरिक शैली असून, तिचा उगम इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात गुप्त काळात झाला आणि मुस्लिमांच्या आगमनापर्यंत ती राहिली, असे सांगितले जाते. कंपनीने सांगितले की, आत्तापर्यंत मुख्य मंदिराचे १४ दरवाजे आणि मंदिराभोवतीच्या १०० फ्रेम बनवण्यात आल्या आहेत.
अयोध्या सर्वांना शिकवणार ‘मर्यादा, धर्म आणि संस्कृती’
रामजन्मभूमीवर उभारण्यात येणाऱ्या भगवान रामाच्या मंदिराचा २२ जानेवारी रोजी होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा व येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असलेला दौरा या पार्श्वभूमीवर अयोध्यानगरीत जागोजागी ‘मर्यादा, धर्म आणि संस्कृती’ असे लिहिलेले मोठे फलक महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. मोदी शनिवारी अयोध्या येथील नव्या विमानतळाचे व पुनर्विकास केलेल्या अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करणार आहेत. विमानतळ ते रेल्वे स्टेशनपर्यंत मोदी यांचा रोड शो होणार आहे. त्यामुळे अयोध्या रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या संख्येने सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. या रेल्वे स्थानकाच्या इमारतीसमोर तसेच स्टेशन रोडवर मोठ्या आकाराचे फलक लावले आहेत.