पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करणारा कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रार याला केंद्र सरकारनेदहशतवादी घोषित केले आहे. युएपीएअंतर्गत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने गेल्या पाच दिवसांत काश्मीरमधील दोन संघटनांना दहशतवादी संघटना घोषित केले होते. यानंतर आता खलिस्तानशी संबंधीत लोकांवर नजर वळविली आहे. गोल्डीचे प्रतिबंधीत खलिस्तानी संघटना बब्बर खालसा सोबत संबंध आहेत. यामुळे त्याच्यावर भारत विरोधी कारवाया केल्यावरून दहशतवादी घोषित करण्याची कारवाई केली जात असल्याचे पत्रकाद्वाके केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचा आरोप असलेला ब्रार कॅनडामध्ये लपला आहे. ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्रांची तस्करी असे सुमारे १३ गुन्हे दाखल आहेत. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे. सप्टेंबर महिन्यात पोलिसांनी गोल्डी ब्रारच्या घरावर छापा टाकला होता. एनआयएदेखील ब्रारशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवरही छापे टाकले आहेत.
30 डिसेंबर म्हणजेच शनिवारी केंद्र सरकारने लखबीर सिंग लांडा याला देखील दहशतवादी घोषित केले आहे. लांडा हा पंजाबमधील आरपीजी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. एनआयएने लांडावर १५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तो देखील कॅनडामध्ये लपला आहे. एकंदरीत कॅनडा हा देश पाकिस्ताननंतर दहशतवाद्यांचे माहेरघर बनला आहे.