नवी दिल्ली - प्रसिद्ध गोल्फर ज्योति रंधावा याला पोलिसांनी अटक केली आहे. ज्योति रंधावावर अवैधरित्या शिकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानं उत्तर प्रदेशच्या बहराईच येथे बेकायदेशीररित्या शिकारी केल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याकडून 22 रायफल्स देखील जप्त करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश वनविभागानं रंधावाविरोधात बुधवारी (26 डिसेंबर) ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वन्य पक्षाची शिकार केल्याप्रकरणी रंधावाला अटक करण्यात आली आहे.
वन्यजीवन संरक्षण कायद्यांतर्गत वन्य जिवांची शिकार करण्यास मनाई आहे. या कायद्या अंतर्गतच रंधावाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात रंधावाच्या मालकीची जमीन आहे आणि गेल्या तीन दिवसांपासून तो जंगल परिसराच्या आसपासही दिसत आहे. कतर्नियाघाटाच्या मोतीपूर रेंज येथील दुधवा टायगर रिझर्व्हजवळ रंधावाला ताब्यात घेण्यात आले. डीएफओ आणि त्यांचे संपूर्ण पथक रंधावाची चौकशी करत आहेत.
(Tanushree Dutta Controversy: चित्रांगदा सिंगचा तनुश्री दत्ताला पाठिंबा)
46 वर्षीय ज्योति रंधावानं 8 एशियन टुर्सव्यतिरिक्त जपान गोल्फ टूरचा एक किताब जिंकला आहे. 2004 ते 2009 या कालावधीदरम्यान त्यानं जगातील टॉप 100 गोल्फर्संमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केले आहे. तर 2001 मध्ये ज्योति रंधावाचे बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंहसोबत लग्न झाले होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही.