पणजी : गोमंतकियांचे दरडोई उत्पन्न सध्या देशात सर्वाधिक म्हणजे २ लाख ५७ हजार ४९० रुपये (प्रतिमाणसी) असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. गोवा सरकारचा हा एकूण १४ हजार ६९४.१७ कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेला १५८.८२ कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प आहे.पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात ७ टक्क्यांनी वाढ, गृह आधार योजनेंतर्गत महिलांना दरमहा एक हजार ५०० रुपयांचे अर्थसाहाय्य, कृषी व मत्स्योत्पादन क्षेत्रासाठी विविध सवलती, सरकारी सेवेत भरतीसाठी उमेदवारांच्या वयोमर्यादेत ४५ वर्षांपर्यंत वाढ, कॅसिनोंच्या प्रवेश शुल्कात ३०० रुपयांची वाढ अशा तरतुदी अर्थसंकल्पात आहेत.पेट्रोलवर सध्या मूल्यवर्धित कर १५ टक्के असून, त्यात २२ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने २ एप्रिलपासून पेट्रोल लीटरमागे ३ रुपये ८२ पैशांनी महागणार आहे. सध्या राज्यात पेट्रोलचा दर ५० रुपये ९८ पैसे आहे. तो ५४ रुपये ८० पैसे होणार आहे. गृह आधार योजनेखाली सध्या महिलांना एक हजार २०० रुपयांचे अर्थसाहाय्य मिळते. ते दीड हजार रुपये करण्यात आले आहे. सरकारी नोकरीची ४0 वयोमर्यादा ४५ करण्यात आली आहे. ‘लाडली लक्ष्मी’ योजनेचा लाभ आता महिलांना ४५ वर्षांपर्यंत घेता येईल. नारळ विकास मंडळाची स्थापना झाली आहे. (विशेष प्रतिनिधी)दृष्टिक्षेपात सवलती... - कोकणी व मराठी शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यास ४०० रु. अनुदान- मच्छीमारांसाठी पेट्रोल कोट्यात १,७०० लीटरपर्यंत वाढ- गोशाळा व संस्थांना पशुपालन योजनेचा लाभ- माड कापण्यासाठी कृषी खात्याकडून ‘ना हरकत’ दाखला सक्तीचा- सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्यास ‘गोपाळ रत्न’पुरस्कार- पारंपरिक रापणकारांना जाळे खरेदीसाठी ५० टक्के अनुदान
गोमंतकीय सर्वांत श्रीमंत
By admin | Published: March 17, 2016 1:48 AM