नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. साता जन्माची साथ अवघ्या 2 तासांत सुटली आहे. रात्री लग्न झालेल्या नवरदेवाचा सकाळी अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घरामध्ये आनंदाचं वातावरण असताना सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. वराच्या मृत्यूची बातमी येताच नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेवाला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अवघ्या दोन तासांत नववधू विधवा झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील कर्नलगंज भागातील आदमपूर येथील जमुना भारती यांची मुलगी सोनिया भारती हिचा विवाह छपिया भागातील रहिवासी प्रदीप भारतीसोबत ठरला होता. रविवारी सकाळपासूनच लग्नाची तयारी सुरू होती. प्रदीप भारतीही सायंकाळी वरात घेऊन पोहोचला.
विधी केले गेले आणि रात्री प्रदीप व सोनियाने सप्तपदी घेतले आणि एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथही घेतली. पहाटे पाच वाजता नवरदेवाची तब्येत अचानक बिघडली. कोणाला काही समजण्याच्या आतच त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. हे पाहून तेथे भीतीचे वातावरण निर्माण झाले. घाईघाईत नवरदेवाच्या कुटुंबीयांनी त्याला एका खासगी डॉक्टरकडे नेले. तेथून त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले आणि जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच नवरदेवाचा मृत्यू झाला.
नवरदेवाच्या मृत्यूची बातमी मुलीच्या नातेवाईकांपर्यंत येताच एकच गोंधळ उडाला. दोन तासांपूर्वी लग्नाचे सप्तपदी घेतलेल्या मुलीच्या नवऱ्याचे निधन झाल्याचे ऐकून सर्वच हादरले. वधूचे वडील जमुना भारती यांनी सांगितले की, नवरदेवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याला त्याच्या निवासस्थानी नेण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, याप्रकरणी अद्याप कोणतीही नोंद झालेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.