Gonda Train Accident: उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे गुरवारी(दि.18) दुपारी एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. चंडीगड येथून आसामला जाणाऱ्या दिब्रुगड एक्स्प्रेसचे 8-10 डबे रुळावरून घसरले. या अपघातात 4-5 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने मदत आणि बचावकार्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणात एक मोठा दावा करण्यात येतोय.
अपघात की, कट? लोको पायलटचा मोठा दावाअपघातानंतर आता चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसच्या (15904) लोको पायलटने जे सांगितले, त्यावरुनही हा अपघात होता की, कट होता? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अपघातापूर्वी एका मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकल्याचा दावा लोको पायलटने केला आहे. त्याच्या या दाव्यामुळे अपघाताचे गांभीर्य वाढले आहे. उत्तर प्रदेश एटीएसचे पथक या अपघाताचा तपास करणार आहे.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, दिब्रुगड-चंदीगड एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानेही स्फोटाचा आवाज ऐकल्याचा दावा केला आहे. तो म्हणाला की, "मला हाजीपूरला जायचे होते. अपघातापूर्वी एका स्फोटाचा आवाज ऐकला आणि त्यानंतर जोरदार धक्का बसून आमचा डबा रुळावरून घसरला."
रेल्वे मंत्रालयाने भरपाई जाहीर केलीरेल्वे मंत्रालयानेही मृत आणि जखमींना भरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2.5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.