ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी नव्या बहुप्रतिक्षित नागरी हवाई धोरणाला मंजुरी दिली. नव्या धोरणात हवाई क्षेत्राचा विस्तार आणि प्रवासी संख्या वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने ५/२०च्या नियमामध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे.
आधीच्या अटींनुसार भारतीय हवाई कंपन्यांना परदेशात हवाई वाहतूक सुरु करण्यासाठी पाच वर्षांचा अनुभव अनिवार्य होता. आता नव्या प्रस्तावानुसार भारतीय कंपन्यांकडे परदेशात हवाई सेवा सुरु करण्यासाठी वीस विमानांचा ताफा आवश्यक आहे. मात्र पाचवर्ष थांबावे लागणार नाही. नव्या प्रस्तावानुसार भारतीय हवाई कंपन्या सहजपणे परदेशात हवाई सेवा सुरु करु शकतात.
तसेच ठराविक मार्गावरील तासाभराच्या प्रवासाच्या तिकीट दरांवर नियंत्रण आणले आहे. ज्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. नवे धोरण गेमचेंजर ठरेल आणि २०२२ पर्यंत भारतीय हवाई क्षेत्र जगातील तिस-या क्रमांकावर पोहोचेल असा विश्वास केंद्रीय हवाई उड्डयाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी व्यक्त केला.