शीलेश शर्मा / नवी दिल्लीपंतप्रधान मोदी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे देशाचे जगात हसे होत आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. नोटाबंदीच्या मुद्द्यावर टीका करताना ते म्हणाले की, २०१९ मध्ये काँगे्रस सत्तेत आल्यानंतरच ‘अच्छे दिन’ येणार आहेत. काँग्रेसच्या ‘जन वेदना’ बैठकीत बोलताना ते म्हणाले की, मोदी यांच्या या निर्णयामुळे अर्थव्यवस्था १६ वर्षे मागे गेली आहे. भाजप, आरएसएस आणि मोदी यांनी अडीच वर्षांच्या काळात आरबीआय, न्यायपालिका आणि निवडणूक आयोग या संस्थांना कमकुवत केले आहे. या संस्था भारताचा आत्मा आहेत. त्यांना या सरकारने दुर्बल केले आहे. तर, मनरेगाच्या कामात अचानक वाढ का झाली आहे? लोक शहराच्या ऐवजी गावाकडे का जात आहेत? हे मोदी यांना विचारायला हवे, असेही ते म्हणाले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही मोदी सरकारवर टीका करताना, यापेक्षा वाईट काळ येणे अद्याप बाकी आहे, असे भाष्य केले आहे. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे एक आपत्ती आहे. याचा सर्वात वाईट काळ येणे अद्याप बाकी आहे. याबाबतचे दावे पोकळ आहेत. मोदी यांचा दुष्प्रचार सुरु आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे लोकांना हे सांगायला हवे. मोदी सरकार काय चुकीचे करत आहे याबाबत देशवासीयांच्या जागृतीसाठी आवाहन करण्याची गरज आहे, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ८ नोव्हेंबरच्या कॅबिनेटमध्ये नोटाबंदीचा निर्णय झाल्याचा दस्तावेजच नसल्याचा आरोप केला. कॅबिनेटचा निर्णय कोठे आहे? असा सवाल करुन चिदंबरम म्हणाले की, भारताच्या इतिहासात असा ‘फार्स’ कधी झाला नव्हता. आरबीआयच्या प्रतिष्ठेला या निर्णयानंतर धक्का बसला आहे. जीडीपीतील घसरणीमुळे देशाचे दीड लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसनेही चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटात किती टक्के रक्कम काळा पैसा होता? याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. भारतीय अर्थव्यवस्था काळ्या पैशांवर आधारित असल्याचे सांगत देशाची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे. नोटाबंदीनंतरच्या ५० दिवसात भाजपचे काही भ्रष्ट नेते, काळा बाजार करणारे आणि बँक अधिकारी यांच्या अपवित्र एकीतून अवैध प्रकारे नोटा बदलण्यात आल्या. भ्रष्ट व काळा पैसा बाळगणाऱ्यांसाठी बँकेचे मागचे दरवाजे खुले झाले पण, आमआदमी समोर रांगेत उभा होता, असा आरोपही पक्षाने केला. मोदींची निष्पक्ष चौकशी करानरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे काही आरोप आहेत. याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे. नोटाबंदीमुळे कृषी, बांधकाम आणि अन्य क्षेत्रांतील लाखो कामगारांचा रोजगार गेला, असा आरोप करीत. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांवर अत्याचार वाढले असून गरीबांवरील हल्ले वाढले आहेत, अशीही टीका काँग्रेसने केली आहे.भारताच्या इतिहासात असा ‘फार्स’ कधी झाला नव्हता. आरबीआयच्या प्रतिष्ठेला या निर्णयानंतर धक्का बसला आहे.- पी. चिदंबरम, माजी अर्थमंत्री
काँग्रेसच पुन्हा आणू शकेल ‘अच्छे दिन’ - राहुल गांधी
By admin | Published: January 12, 2017 4:52 AM