नवी दिल्ली - भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या एचसीएल कंपनीत 25 ते 30 हजार जागांची भरती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षातच ही मेगा भरती केली जाणार आहे. त्यामुळे आयटी इंजिनिअर्संना जॉब मिळवण्याची मोठी संधी असणार आहे. डिलिव्हरी सर्व्हीस, ग्राहक सेवा केंद्र आणि कंपनी इंजिनिअर्सच्या माध्यातून या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. टेक्नॉलॉजीशी संबंधित या नोकऱ्या असतील, असे कंपनीच्या एच.आर. विभागातून सांगण्यात आले आहे.
कंपनीचे प्रमुख एच.आर. व्यवस्थापक व्ही व्ही आप्पाराव, यांनी एका मुलाखतीवेळी ही माहिती दिली. एचसीएल कंपनीकडून आगामी काळात 25 ते 30 हजार नोकऱ्या देण्यात येतील. कंपनीचा ग्रोथ रेट वाढवणे आणि मार्केट अडव्हाईससाठी कंपनीला एम्प्लॉईजची गरज आहे. तसेच कंपनीला नवनवीन इंजिनिअर्स आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील फ्रेशर्सची गरज आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीकडून cloud, IoT, cybersecurity, digital and analytics साठी हुशार आणि मेहनती अभियंत्यांची गरज आहे. सध्या कंपनीकडे 30 सप्टेंबरपर्यंत 1,27,875 कर्मचारी होते. त्यामध्ये वाढ करुन आणखी 3,754 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. अमेरिकेत एचसीएल टेक कंपनीत जवळपास 17,000 कर्मचारी आहेत. त्यामध्ये जवळपास 65% टक्के संख्या स्थानिक कर्मचाऱ्यांची आहे.
टीएसएसमध्ये नोकरीच्या 40 टक्के नवीन संधी
टीसीएस म्हणजेच टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसकडून आणखी 40 टक्के नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यात येणार आहेत. नुकतेच इंजिनिअरींगची पदवी प्राप्त केलेल्या युवकांना या नोकरीच्या संधी उपलब्ध असणार आहेत. टीसीएकडून 28 हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असे मुंबईच्या प्रमुख कार्यालयातून सांगण्यात आले आहे. मात्र, या सर्व इच्छुक उमेदवारांना NQT म्हणजेच नॅशनल क्वालिफायर टेस्ट परीक्षा पास होणे बंधनकारक असणार आहे. गतवर्षी कंपनीने 20 हजार फ्रेश पदवीधर तरुणांना नोकरीची संधी दिली होती.