अंबाला/ बंगळुरू : पठाणकोट दहशतवादी हल्ल्यातील शहिदांवर सोमवारी शोकाकुल वातावरणात संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवानांचे नातेवाईक आणि शेकडो गावकऱ्यांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. आप्तगणांचा अश्रूंचा बांध फुटल्यामुळे उपस्थितही हेलावून गेले, ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. गरुड कमांडोचा जवान गुरसेवकसिंग यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव अंबालाजवळील गारनाला या त्यांच्या जन्मगावी आणण्यात आले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांच्या घरासमोर एकच गर्दी केली होती. गुरसेवकसिंग यांचा विवाह अलीकडेच १८ नोव्हेंबर रोजी झाला होता. त्यांची पत्नी आणि कुटुंबियांचा शोक अनावर झाला होता. गुरसेवकसिंग शहीद भगतसिंगांना आदर्श मानत होते. त्यांचे वडील सूचासिंग हेही लष्करात होते. बंधू हरदीप हे सुद्धा संरक्षणदलात आहेत.हरियाणाचे मंत्री अनिल वीज आणि अभिमन्यू यांच्यासह वायुदलातील वरिष्ठ अधिकारी, लष्करी जवान, पोलीस आणि मुलकी प्रशासनातील अनेक अधिकारी अंत्यसंस्काराच्यावेळी उपस्थित होते. पठाणकोटच्या एअरबेसवर एका अतिरेक्याच्या मृतेदहाला लागून असलेला ग्रेनेड निकामी करण्याच्या प्रयत्नात शहीद झालेले लेप्ट. कर्नल ई.के. निरंजन यांचे पार्थिव प्रारंभी बेंगळुरू येथे आणण्यात आल्यानंतर केरळमधील पलक्कड येथील मूळगावी नेण्यात आले. निरंजन याच्या बलिदानाबद्दल मला अभिमान आहे. त्याने नेहमीच लष्कराच्या सेवेत स्वारस्य दाखविले होते, असे त्यांचे वडील शिवराजन यांनी डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करवून देत म्हटले. निरंजन यांच्या भगिनींनी कर्मभूमीसाठी लढणाऱ्या अर्जुनाची उपमा देत भावाला आदरांजली अर्पण केली. निरंजन यांच्या मागे पत्नी डॉ. राधिका आणि अवघ्या १८ महिन्यांची मुलगी आहे. निरंजन यांचे कुटुंबीय बेंगळुरू येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे सर्व सहकारी आणि मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले.(वृत्तसंस्था)शहीद झालेले ५१ वर्षीय सुभेदार फतेहसिंग यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी पदके जिंकली आहेत. गुरुदासपूर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी शेकडो लोक गोळा झाले होते. जवानांनी त्यांचे पार्थिव स्मशानभूमीवर आणले त्यावेळी त्यांची कन्या मधू हिने पार्थिवाला खांदा देत कर्तव्य पार पाडले. माझ्या वडिलांनी जे केले त्याच्याशी कशाशीही तुलना होऊ शकत नाही, असे मला वाटते. मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे, असे मधू हिने म्हटले. पठाणकोट एअरबेसवर अतिरेक्यांच्या हल्ल्याला तोंड देताना सात जवान शहीद झाले आहेत. त्यात डिफेन्स सेक्युरिटी कॉर्प्सच्या पाच जवानांचा समावेश आहे.
शहीद वीरांना शोकाकुल वातावरणात निरोप
By admin | Published: January 05, 2016 12:38 AM