नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सोमवारी उद्धाटन केलेल्या ‘सौभाग्य’ योजनेत कोणालाही फुकट वीज पुरविली जाणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने बुधवारी केले.या योजनेचे नेमके स्वरूप काय आहे, याची माहिती ऊर्जा मंत्रालयाने जारी केली. त्यानुसार गरिबांना वीज जोडणी विनामूल्य दिली जाईल. इतरांना वीज जोडणीसाठी ५०० रुपये द्यावे लागतील. ही रक्कम वीज कंपनी बिलातून १० हप्त्यांत वसूल करेल.मात्र वीज जोडणी दिल्यानंतर, गरीब असो वा नसो, प्रत्येक ग्राहकास त्याने वापरलेल्या वीजेचे ठरलेल्या दराने पैसे मोजावे लागतील.मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार विनामूल्य किंवा ५०० रुपये घेऊन दिलेल्या जोडणीमध्ये जवळच्या विजेच्या खांबापासून ग्राहकाच्या घरापर्यंत विजेची तार टाकणे, विजेचे मीटर बसविणे आणि एक एलईडी बल्ब व एक मोबाईल चार्जिंग पॉर्इंट यांच्यासाठी वायरिंग करणेइत्यादी कामे केली जातील. घराजवळ विजेचा खांब नसेल तर तो टाकण्याचे कामही याच योजनेत केले जाईल.वीज जोडणीसाठीचे अर्ज व आवश्यक माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतली जाईल. यासाठी ग्रामीण भागांमध्ये विशेष शिबिरे भरविण्यात येतील व आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यावर ग्राहकास जागच्या जागी वीज जोडणी मंजूर करण्यात येईल.२४ हजार कोटींचा महसूलया योजनेवर केंद्र सरकार सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च करेल. परंतु योजना पूर्ण होऊन सर्व अपेक्षित चार कोटी ग्राहकांना वीज पुरविणे सुरु झाल्यावर त्यातून राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांना दरमहा २४ हजार कोटी रुपयांचा जादा महसूल मिळेल, असे ढोबळ गणित आहे.या नव्या ग्राहकांमुळे वीजेची मागणी वर्षाला अंदाजे ८० हजार दशलक्ष युनिटने वाढेल व वीजेचा दर युनिटला सकारी ३ रुपये गृहित धरला तरी वीज कंपन्यांना २४ जहार कोटी रुपये जादा महसूल मिळेल.
‘सौभाग्य’ची वीज फुकट नाही! गरिबांना फक्त वीज जोडणी विनामूल्य, सरकारचा खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 2:10 AM