नवी दिल्ली : कोरोनाचा कहर जगभरात वाढत असताना देशभरातून एक चांगली बातमी आली आहे. लागण झालेल्यांपैकी तब्बल ५०६३ जणांनी कोरोनावर मात केली असून ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.
आज केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली. यामध्ये गेल्या २४ तासांतील सापडलेले नवे रुग्ण, मृत्यू यांची आकडेवारी दिली आहे. ही आकडेवारी कोरोनाची भीती काहीशी दूर करणारी ठरणार आहे. भारतात आतापर्यंत एकूण 24,506 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यापैकी 5063 जण बरे झाले असून ७७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या विविध राज्यांमध्ये 18,668 जण उपचार घेत आहेत.
गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे १४२९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ५७ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने काही अटींवर अत्यावश्यक व्यतिरिक्त सर्व दुकानांना उघडण्याची परवानगी दिली आहे. महिनाभराच्या लॉकडाऊननंतर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या आदेशामध्ये शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्सना परवानगी देण्यात आलेली नाही. निवासी कॉलनीच्या जवळील दुकाने आणि स्टँड अलोन दुकाने आजपासून उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी शहरी भागाला वगळण्यात आले आहे.
आणखी वाचा...
देशभरात काही अटींवर अन्य दुकाने उघडणार; दारुच्या दुकानांबाबत घेतला हा निर्णय
मोठा दिलासा! आजपासून सर्व दुकाने उघडणार; शॉपिंग मॉल, कॉम्प्लेक्स बंदच राहणार
किम जोंग उन अत्यवस्थ नाहीत; तरीही उपचारासाठी चीनने पाठविली डॉक्टरांची फौज