ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - भारतीय वायुदलातील युद्धमोहिमांमध्ये महिला वैमानिकांच्या सहभागावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता नौदलातील महिलांसाठी आता खुशखबर... ज्या महिला नौदलात ७ वर्षांचा सेवाकाळ पूर्ण करतील त्यांना नौदलात कायमस्वरूपी करण्यात येणार असल्याची घोषणा भारतीय नौदलाने बुधवारी केली.
काही दिवसांपूर्वीच वायूदलप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी भारतीय वायुदलात आता पुरुष वैमानिकांच्या खांद्याला खांदा लावून महिला वैमानिकही युद्धमोहिमांमध्ये भाग घेऊ शकतील असे स्पष्ट केले होते. येत्या १८ जून रोजी भारतीय हवाई दलाला पहिली महिला लढाऊ वैमानिकांची तुकडी मिळणार असल्याची माहिती भारतीय हवाई दलाचे प्रमुख मार्शल अरुप रहा यांनी दिली आहे. सध्या ३ महिलांचे प्रशिक्षण चालू आहे. प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरु आहे. त्यांचं प्रशिक्षण पुर्ण झालं की १८ जूनला पासिंग परडे होणार आहे. पासिंग परेड पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवेत घेतलं जाईल त्यानंतर त्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक असतील अशी माहिती अरुप रहा यांनी दिली आहे. तर आता नौदलातील महिलांनाही ७ वर्षांच्या सेवेनंतर कायमस्वरूपी करण्यात येणार आहे.
दरम्यान, लष्करातील महिलांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा यासाठी काय उपाययोजना करता येतील, यासाठी सविस्तर अहवाल सादर करण्याचा आदेश केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी तिन्ही दलाच्या प्रमुखांना काही दिवसांपूर्वीच दिला होता.