नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची ड्रीट ट्रेन असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, तिकीट दरामुळे या ट्रेन प्रवासाकडे प्रवाशांना पाठही फिरवल्याचे दिसून येत. सन २०१९ मध्ये भारतीय रेल्वेने स्वदेशी बनावटीची हाय स्पीड वंदे भारत ट्रेन सुरू केली. ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीसही उतरली. या ट्रेनचा गतिमान आणि सुरक्षित प्रवास रेल्वे प्रवाशांना भावला आहे. मात्र, जादा तिकीट भाड्यामुळे प्रवाशी नाराज होते. आता, रेल्वे बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून वंदे भारतच्या तिकीट दरात मोठी कपात करण्यात येणार आहे.
वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अधिकचा पैसा मोजावा लागत असल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी या तिकीटदराची तुलना थेट विमानाच्या तिकाटांशीही केली होती. त्यामुळेच, अनेक मार्गावरील वंदे भारत ट्रेनकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. या तिकीट दरावरून भारतीय रेल्वेची मोठी अडचण झाली. तर, केवळ उच्चभ्रू आणि उद्योजक, व्यापाऱ्यांसाठीच ही ट्रेन सुरू करण्यात आल्याचा सूरही दिसून आला. त्यामुळे, अखेर रेल्वे बोर्डाने यासंदर्भात चिकित्सा करत, वंदे भारत ट्रेनच्या तिकीटदरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
देशातील सर्वच गतीमान ट्रेनच्या एक्झिक्युटीव्ह चेअर आणि एसी चेअरच्या तिकीट दरात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात येणार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. विशेष म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसमध्येही ही दरकपात लागू होणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाने दिली आहे. त्यामुळे, प्रवाशांना निश्चितच दिलासा मिळणार असून आता वंदे भारत एक्सप्रेसला अधिक पसंती मिळेल.
दरम्यान, सद्यस्थिती देशातील २४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून पाच गाड्या धावत आहेत. नागपूर बिलासपूर, मुंबई-गांधीनगर, मुंबई-साईनगर शिर्डी, मुंबई सोलापूर आणि मुंबई गोवा या मार्गावर ही हाय स्पीड वंदे भारत ट्रेन चालवली जात आहे. लांब पल्ल्याच्या अंतरावरील मार्गावर सुरू असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. मात्र, तिकीट दर जास्त असल्याची तक्रारही केली जात आहे.