नवी दिल्ली : कोरोनाच्या लढाईत भारतासाठी आनंदाची बातमी आहे. वर्षाच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या सुरूवातीला कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजरी दिली जाऊ शकते. यासंदर्भातील माहिती गुरुवारी दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली.
सध्या भारतात 6 लसींवर काम सुरू आहे. ज्यामध्ये ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका आणि भारत बायोटेक लसीच्या तिसरा टप्प्यातील चाचणी सुरु आहे. विशेष म्हणजे, ब्रिटनने लसीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या फायझरला आपत्कालीन मंजुरी दिली आहे.
तिसरा टप्प्यातील चाचणी घेत असलेल्या लसींपैकी कोणत्याही एका लसीला मंजुरी मिळू शकते. ही मंजुरी डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरूवातीला दिली जाऊ शकते. या लसीला मंजुरी मिळाल्यानंतर भारतातही लसीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती डॉक्टर गुलेरिया यांनी दिली आहे.
दरम्यान, ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस कोव्हशिल्डची तिसऱ्या टप्प्यात चाचणी आंतरराष्ट्रीय स्तरावर समोर आली आहेत. तसेच, ही लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार केली जात आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, कंपनी लवकरच आपत्कालीन मंजुरीची तयारी करत आहे.
लस अल्प मुदतीसाठी सुरक्षित आहे. सध्याच्या डेटानुसार,असे म्हणता येईल की ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. लसीची सुरक्षा आणि कार्यक्षमतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सध्या ही लस 70 ते 80 हजार स्वयंसेवकांना दिली गेली असून त्याचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आले नाहीत, असे डॉक्टर गुलेरिया यांनी सांगितले.
दुसरीकडे, युनायटेड किंगडमने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. अमेरिका आणि यूरोपीय संघाच्या निर्णयाने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजुरी देणारा युनायटेड किंगडम पश्चिमेकडील पहिला देश बनला आहे. ही लस पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये उपलब्ध होईल. तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही बुधवारी रशियन अधिकाऱ्यांना पुढच्या आठवड्यापासून ऐच्छिक लसीकरण सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.