पुणे : कोरोनावर प्रभावी ठरू शकणाऱ्या ‘कोविशिल्ड’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सोमवारी (दि. ७) केंद्र सरकारकडे अर्ज केला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी ट्विट करून ही माहिती दिली. केंद्राकडून परवानगी मिळाल्यास लसीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळू शकणार आहे.इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनिकातर्फे संशोधित केल्या जाणाऱ्या कोरोनावरील ‘कोविशिल्ड’ लसींचे उत्पादन सुुरू आहे. सध्या सिरममध्ये दर महिन्याला ५ ते ६ कोटी डोस तयार होत आहेत. लस उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच २८ नोव्हेंबरला पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती.‘आपत्कालीन परिस्थितीत ‘कोविशिल्ड’च्या वापरासाठी दोन आठवड्यांत औषध महानियंत्रकांकडे अर्जाद्वारे मागणी करणार आहे,’ असे अदर पूनावाला यांनी मोदी यांच्या पुणे भेटीनंतर स्पष्ट केले होते. त्यानुसार परवानगी मागितली असल्याचे त्यांनी ट्विट कळविले. यामुळे हजारो जणांचे प्राण वाचू शकणार आहेत. आम्हाला मिळालेल्या पाठिंब्याबाबत मी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो,’ असे पूनावाला यांनी म्हटले होते. लस वितरणासाठी सिरमकडून भारतालाच प्राधान्य दिले जाणार आहे. जुलै २०२१ पर्यंत केंद्र सरकारला ३० ते ४० कोटी डोस पुरविण्याचे लक्ष्य ‘सिरम२समोर आहे. यापूर्वी फायझर या अमेरिकेतील कंपनीने दोन दिवसांपूर्वी केंद्राकडे आपत्कालीन परिस्थितीत लसीच्या वापराला परवानगी देण्याची मागणी केली आहे.
खूशखबर : कोविशिल्ड लस वापरासाठी तयार, आपत्कालीन उपयोगासाठी सिरमचा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 7:15 AM