आणंद (गुजरात) : देशातील प्रसिद्ध दुग्ध पदार्थ उत्पादक संघ अमूल आजपासून सांडनी म्हणजेच उंटीनीचे दूध विक्री करणार आहे. याची सुरुवात गुजरातच्या अहमदाबाद, कच्छ आणि गांधीधामपासून करण्यात येणार आहे. अमूलची मालकी गुजरात कोऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशनकडे आहे. या महासंघासोबत राज्यातील 18 डेअरी जोडलेल्या आहेत.
फेडरेशनचे महाप्रबंधक आर एस सोढी यांन मंगलवारी सांगितले की सांडनीचे दूध बुधवारपासून बाटलीमध्ये विकले जाणार आहे. या दुधाचे अनेक फायदे आहेत. मधुमेहावर अत्यंत गुणकारी आहे. शिवाय यामध्ये अनेक तऱ्हेचे पोषक तत्वे आणि औषधीय गुणधर्म आहेत. तसेच हे दूध पचण्यासही हलके आहे. गाय आणि म्हशीच्या दुधापासून ज्यांना अॅलर्जी आहे, ते लोक हे दूध पिऊ शकणार आहेत. सांडनीच्या दुधाची किंमत 50 रुपये प्रती लिटर असणार आहे. कच्छच्या सरहद डेअरीने सुरुवातीला चार ते पाच हजार लीटर सांडनीचे दूध गोळा करण्यास सुरुवात केली होती. हे प्रमाण वाढल्यानंतर अन्य ठिकाणीही दूध विक्री सुरु करण्यात येणार आहे.
चॉकलेट आधीच लाँच केले होते...सांडनीच्या दुधापासून बनविलेले चॉकलेट गेल्यावर्षीच बाजारात आणण्यात आले होते. या चॉकलेटला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. अमुलचे सांडनीचे दूध फ्रिजमध्ये तीन दिवस टिकू शकते.