नवी दिल्ली - BJP 5 candidates elected unopposed ( Marathi News )अरुणाचल प्रदेशात मतदानापूर्वीच मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह भाजपाचे ५ उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. या उमेदवारांविरोधात कुणीही अर्ज भरला नाही. त्यामुळे भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत. अरुणाचल प्रदेशात येत्या १९ एप्रिलला विधानसभेच्या ६० जागांसाठी मतदान होणार आहे. त्याआधी भाजपासाठी ही आनंदाची बातमी आली आहे.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे मुक्तो विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध विजयी होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर भाजपाचे इतरही उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघातून बिनविरोध जिंकणार आहेत. अरुणाचल प्रदेशातील पापुम पारेसह अनेक जागांवर विरोधी पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे ५ जागांवर सत्ताधारी भाजपाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
सगालीहून एर रातू तेची बिनविरोध विजयी होत एक प्रमुख दावेदार म्हणून पुढे आले आहेत. त्याशिवाय निचले सुबनगिरी जिल्ह्यातील जीरोहून एर हेज अप्पा यांनाही कुणी विरोध केला नाही. ज्यामुळे भाजपाची ताकद वाढली आहे. तालीहून जिक्के ताको, तलिहाहून न्यातो डुकोम, सगाली रातू तेची आणि रोईंग विधानसभा मतदारसंघातून मुच्चू मीठी बिनविरोध आले आहेत. विधानसभेच्या जागांसाठी बुधवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. या ५ जागांवर भाजपा व्यतिरिक्त कुठल्याही पक्षाने किंवा अपक्षाने अर्ज दाखल केला नाही.
अरुणाचल प्रदेशात सध्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होत आहेत. त्यात ६० सदस्यीय विधानसभा आणि २ लोकसभा जागेवर १९ एप्रिलला मतदान होत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अरुणाचल प्रदेशातील २ जागांवर १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणूक प्रक्रियेत २७ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. अर्जाची पडताळणी गुरुवारी आणि ३० मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. विधानसभेची मतमोजणी २ जून तर लोकसभा जागांची मतमोजणी ४ जूनला होणार आहे.