Agniveer Scheme : केंद्र सरकारने आणलेल्या अग्नीवीर योजनेवरुन देशात बराच गदारोळ सुरू आहे. दरम्यान, केंद्र सरकारने माजी अग्नीवीरांसाठी केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये आरक्षणाची घोषणा केल्यानंतर आता उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारनेही माजी अग्निवीरांना राज्यातील पोलीस भरतीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही घोषणा केली आहे.
सीएम योगी म्हणाले की, अग्निवीर ही चांगली योजना आहे पण विरोधक लोकांची दिशाभूल करत आहेत. अग्निवीर आपली सेवा पूर्ण करुन आल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेश पोलीस विभागातील भरती प्रक्रियेत आरक्षण दिले जाईल. तर मोहन यादव म्हणाले की, आज कारगिल दिनानिमित्त आमच्या सरकारने अग्निवीरांना पोलीस आणि सशस्त्र दलाच्या भरतीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय सुरक्षा दलात 10 टक्के पदे राखीव ठेवण्याचा निर्णयअलीकडेच केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय निमलष्करी दलात 10 टक्के पदे माजी अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, केंद्रीय सशस्त्र दल (CAPF) आणि आसाम रायफल्समध्येही माजी अग्नीवीरांना 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत माजी अग्नीवीरांना कॉन्स्टेबल आणि रायफलमन या पदासाठी वयोमर्यादेत आणि शारीरिक चाचणीत सवलत मिळेल.