नवी दिल्ली : कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) सदस्यांना गोड बातमी दिली आहे. संस्थेने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच काेट्यवधी सदस्यांच्या खात्यात व्याज जमा झालेले दिसणार आहे. ईपीएफओने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे.
मिस्ड काॅलद्वारे मिळवा माहिती
पीएफ खात्यातील जमा रकमेच्या माहितीसाठी माेबाइल क्रमांक यूएएनशी लिंक असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत माेबाइल क्रमांकावरून ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर मिस्ड काॅल द्यावा. त्यानंतर एका एसएमएसद्वारे जमा रकमेची माहिती मिळेल.
व्याज जमा झाले ते कसे पाहणार?
सदस्यांनी ईपीएफओच्या epfindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.तेथे सर्व्हिस टॅबवर क्लिक करून फाॅर एम्प्लाॅइज या लिंकवर क्लिक करावे. या पेजवरील मेंबर पासबुक येथे क्लिक करून आपला यूएएन आणि पासवर्ड टाकावा. लाॅगिन केल्यावर पासबुकचा पर्याय दिसेल. तेथे सर्व माहिती पाहता येईल. या पेजवर आर्थिक वर्ष २०२१-२२ निवडावे. तेथे सर्वात खाली व्याज जमा झालेले दिसेल.
येथे तक्रार करा
व्याज जमा झाले नसल्यास epfigms.gov.in येथे तक्रार करता येईल. या वेबसाईटवर Register Grievance या लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती पुरवून तक्रार दाखल करावी.