नवी दिल्ली - सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा देणारे वृत्त आहे. पुढील महिन्यात घरघुती गॅस सिलेंडरचे दर कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रायपूर येथे घरघुती गॅस सिलेंडरचे दर कमी होणार असल्याचे संकेत दिले. प्रधान दोन दिवसांच्या छत्तीगड दौऱ्यावर आहेत.
इस्मात आणि पेट्रोलियम तथा नैसर्गिक गॅसमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रायपूर येथील स्वामी विवेकानंतर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. एलपीजी गॅसच्या वारंवार वाढत असलेल्या किंमतीवरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, घरघुती गॅसच्या किंमती वारंवार वाढत आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. मात्र आंतराराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे दरवाढ झाली आहे. मात्र पुढील महिन्यात घरघुती गॅस सिलेंडरचे दर कमी होऊ शकतात, असे प्रधान यांनी सांगितले.
दरम्यान थंडीच्या काळात एलपीजी गॅसची मागणी वाढते. त्यामुळे या क्षेत्रावरील दबाव वाढला होता. त्याच कारणामुळे या महिन्यात गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. पुढच्या महिन्यात दर कमी होतील, असं प्रधान यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात 14.2 किलो गॅसचे दर 149 रुपयांनी वाढले होते.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवरील उपलब्ध माहितीनुसार 14.2 किलो गॅस सिलेंडरचे दर दिल्लीत वाढून 858 रुपयांवर गेले आहेत. पूर्वी याच सिलेंडरचा दर 814 रुपये होता. तर मुंबईत 747 रुपयांवरून दर 896 रुपयांवर पोहोचला आहे.