नवी दिल्ली, दि. 28 - गेल्या अनेक दिवसांपासून सिक्कीम बॉर्डरवर भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला वाद अखेर मिटणार आहे. दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. जून महिन्यात डोकलामवरुन वाद सुरु झाला होता. राजनियक चर्चेतून मार्ग निघाला असल्याची माहिती सरकारने दिली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी डोकलाम वाद निवळला असल्याने चीनमधील ब्रिक्स बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
भारतीय आणि चीनी लष्कर सहमतीने सैन्य मागे घेण्यासाठी तयार झालं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी 21 ऑगस्ट रोजी भारत आणि चीनमधील डोकलाम वाद लवकरच सोडवला जाईल असं म्हटलं होतं. राजनाथ सिंह बोलले होते की, 'भारत आपल्या शेजारी देशांसोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. डोकलामसंबंधी लवकरच उपाय काढला जाईल. चीनदेखील यासंबंधी सकारात्मक पाऊल उचलेल'.
15 ऑगस्ट रोजी चीनी सैनिकांनी नियंत्रण रेषा पार करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर भारतीय सैन्य आणि चीनी सैनिकांमध्ये झटापच झाली होती. याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये अशा प्रकारे झटापट होण्याची ही पहिलीच वेळ होती. यानंतर चीनी सैनिकांनी दगडफेक सुरु केली होती. ज्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं होतं. यामध्ये दोन्ही देशाचे जवान जखमी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांनी ब्रिक्स बैठकीत सहभागी होण्यासाठी चीनचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौ-याआधी हा वाद सोडवावा यासाठी प्रयत्न केले जात होते, ज्याचा परिणाम दिसत आहे. भारत आणि चीनने सैन्य मागे घेण्याची तयारी दर्शवली असली तरी आधी सैन्य मागे कोण घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
काय आहे डोकलाम प्रकरण-डोकलाम हे ठिकाण चीन, भारत आणि भूतान यांच्या त्रिकोणावर स्थित आहे. तिन्ही देशांसाठी रणनीतीच्या दृष्टीनं हा महत्त्वपूर्ण भूभाग आहे. भारत व चीन यांच्या सीमा ज्या डोकलाम क्षेत्रात एकत्र येतात तेथे भारतीय सेना चीनच्या सैन्यासमोर गेल्या दीड महिन्यांपासून उभी आहे. भारतीय लष्करानं चीनचे त्या क्षेत्रातील बांधकाम रोखलं आहे. चीनच्या मते तो भूभाग स्वतःच्या मालकीचा असल्यामुळे त्यात रस्ते व अन्य बांधकाम करण्याचा अधिकार आहे. भारताचा आक्षेप या प्रदेशाच्या मालकीबाबतचा जसा आहे तसाच तो चिनी बांधकाम भारताच्या उत्तर सीमेवर एक लष्करी आव्हान उभे करील, असाही आहे. सध्या सिक्किममध्ये भारत-चीनदरम्यान 220 किमीची सीमा आहे. यातील सर्व भागात शांततेचं वातावरण आहे. पण ज्या भागात चीन आणि भारताची सीमा भूतानला जोडली आहे, त्या भागावरुन उभय देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. भारत-भूतान दरम्यान सिक्किममध्ये 32 किमीची सीमा रेषा आहे. जवळपास 50 वर्षांपूर्वी म्हणजे 1967 मध्ये भारतीय लष्कराने सिक्किममध्ये चीनी सैन्याला धुळ चारली होती. त्यानंतर चीनकडून सिक्किमच्या भागात कधीही घुसखोरी झाली नाही. पण गेल्या काही दिवसांपासून या तिन्ही देशांचं ट्रायजंक्शन असलेल्या डोकलाममध्ये तणावाची परिस्थिती होती. चीनने जेव्हा चुंबी खोऱ्यात याटुंगमध्ये डोकलाम परिसरात रस्ते बांधणीचं काम हाती घेतलं. त्यावेळी भारतानं त्याचा कडाडून विरोध केला. पण चीननं या विरोधाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. म्हणून या भागावर लक्ष ठेवण्यासाठी भारतानं दोन बंकर उभारले. पण चिनी सैन्यानं भारताचे हे दोन्ही बंकर उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारतीय लष्कराने आपली ‘रिइनफोर्समेंट’ म्हणजे लष्कराची एक मोठी तुकडी या भागात तैनात केली, तेव्हापासून दोन्ही देशातील सैन्यामध्ये तणाव वाढत होता.