मुंबई : पुढील 2019 हे वर्ष खूप काही घेऊन येणार आहे. तीन वर्षांपूर्वी केलेल्या नोटाबंदीमुळे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळाले असून आधुनिक प्रणालीद्वारे सेवा पुरविण्यासाठी पुढील वर्षात सार्वजनिक बँका तब्बल 1 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. यामध्ये स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा, सिंडिकेट बँक या बँकांचा समावेश आहे.
सरकारी बँकांना एचडीएफसी, आयसीआयसीआय सारख्या खासगी बँकांनी आव्हान उभे केले आहे. सरकारी बँकांना अत्याधुनिक प्रणाली वापरण्यास आणि त्याद्वारे सेवा देण्यास कठीण जात आहे. या तुलनेत खासगी बँकांमध्ये तरुण कर्मचारी जास्त असल्याने त्यांना अत्याधुनिक सेवा देण्यास सोपे जात आहे. यामुळे नवीन वर्षात सरकारी बँका न्यू एज बँकिंग आणि व्यवसाय वृद्धीसाठी नवीन कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
मागील दोन वर्षांत सरकारी बँकांनी 95 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली होती. मात्र, आता होणारी भरती ही दुप्पट आहे. बँकांना मनुष्यबळ पुरविणारी संस्था टीमलीजच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक बँकांनी गेल्या दोन वर्षांत क्लर्क, मॅनेजमेंट ट्रेनी आणि प्रोबेशनरी अधिकारी मोठ्या प्रमाणावर भरती केले आहेत. आता या बँका मोठ्या प्रमाणावर तज्ज्ञ लोकांची भरती करणार आहेत. यामध्ये मालमत्ता व्यवस्थापन, विश्लेषक, धोरण, डिजिटल बँकिंग आणि ग्राहक सेवा या क्षेत्रात भरती होणार आहे.
सरकारी बँकांचा ग्राहक मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना चांगली सेवा देण्यास अपयश येत होते. यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणावर खासगी बँकांकडे वळत आहे. यामध्ये बदल करण्यासाठी या सरकारी बँका नव्या दमाच्या कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत 20 टक्केच क्लर्क काम करतात. या बँकांमध्ये अधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. तर एसबीआयमध्ये हेच प्रमाण 45 टक्के आहे. तसेच या बँकांमध्ये कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 46.5 वर्षे आहे. यामुळे या बँकांना तरुण आणि हुशार मनुष्यबळाची नितांत गरज भासू लागली असल्याचे टीमलीजचे अधिकारी चक्रवर्ती यांनी सांगितले.