नवी दिल्ली- केंद्र सरकारची बहुप्रतीक्षित असलेली उज्ज्वला योजनेचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केंद्रानं सर्व गरीब कुटुंबांना निःशुल्क एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या या प्रस्तावावर कॅबिनेटनं मोहर उमटवल्यामुळे गरिबांना फुकटात एलपीजी गॅस कनेक्शन मिळणार आहे.ही योजना केंद्र सरकारनं 2016मध्ये सुरू केली होती. या योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांकडून कोणतेही शुल्क न आकारता स्वयंपाकाच्या एलपीजी गॅसचं कनेक्शन मोफत मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं सोमवारी पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या विस्ताराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. त्यामुळे आता ज्यांच्याकडे एलपीजी गॅस कनेक्शन नाही, त्यांनाही गॅस कनेक्शन मिळवता येणार आहे.प्रधान म्हणाले, एलपीजी कनेक्शन 2011च्या सामाजिक-आर्थिक जनगणनेच्या आधारावर दिलं जाणार आहे. त्यानंतर अनुसूचित जाती-जमाती, जंगलात राहणारे कुटुंब, मागासवर्ग, द्विप समूहावर राहणारी कुटुंबं, भटक्या-विमुक्त जातींचा यात समावेश करण्यात येणार आहे. या योजनेचा तळागाळातील सर्व गरीब कुटुंबीयांना लाभ पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेमध्ये सरकारी तेल कंपन्या प्रतिकनेक्शन 1600 रुपयांची सबसिडी देणार आहे. ही सबसिडी सिलिंडरच्या फिटींग शुल्काच्या स्वरूपात दिली जाते. ग्राहकांना शेगडी स्वतः खरेदी करावी लागणार आहे.
खूशखबर! मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' लोकांना मिळणार मोफत LPG गॅस कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 3:16 PM