खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 07:06 AM2024-05-20T07:06:56+5:302024-05-20T07:08:46+5:30

सध्याचे पोषक हवामान पाहता ३१ मेपर्यंत मान्सून केरळला, तर ६ ते १० जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

Good news Monsoon hits Andaman-Nicobar reaches Kerala by May 31, reaches Maharashtra by this date | खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

नवी दिल्ली/पुणे : भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनने रविवारी (दि. १९) निकोबार बेटांवर धडक दिली. मान्सूनने रविवारी मालदीवचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, निकोबार द्वीप समूह आणि दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागापर्यंत मजल मारल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. सध्याचे पोषक हवामान पाहता ३१ मेपर्यंत मान्सून केरळला, तर ६ ते १० जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

‘ला नीना’ च्या अनुकूल परिस्थितीमुळे यंदा देशात सामान्यपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. गेल्या वर्षी ‘अल निनो’ सक्रिय होता, तर यंदा तो संपुष्टात येत आहे. त्यामुळे तीन ते पाच आठवड्यांत ‘ला निना’ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये ३१ मे, तसेच दक्षिण कोकणात ५ जून रोजी दाखल होईल आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपूर्वी मान्सून प्रवेश करेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

मान्सूनचा प्रवास सुरू झाला असून, तो सुरळीतपणे पुढे सरकेल. त्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. बंगालच्या उपसागरात २२ मे पासून कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि मान्सूनला ते पोषक ठरेल.    - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ

चार वर्षातील केरळमधील आगमन
८ जून २०२३
२९ मे २०२२ 
३ जून२०२१ 
१ जून २०२०  

सर्वात लवकर - १९१८ (११ मे) 
सर्वात उशिरा - १९७२ (१८ जून)

उत्तर भारतात उष्णतेची लाट 
देशातील अनेक राज्यांत सध्या कमाल तापमानाने उच्चांक गाठला आहे. काही ठिकाणी तर पारा ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. दिल्लीसह, पंजाब, हरयाणा, चंडीगडसह राजस्थानच्या काही भागात पुढील चार दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय गुजरात, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेशचा काही भाग, बिहारच्या काही भागांतही कमाल तापमान वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

जळगाव @ ४४ 
- गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेने जळगावकर हैराण झाले असून, रविवारी तर तापमानाने यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४४ अंशाचा टप्पा गाठला. 
- कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी  हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 

Read in English

Web Title: Good news Monsoon hits Andaman-Nicobar reaches Kerala by May 31, reaches Maharashtra by this date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.